मानूर ग्रामपंचायत मध्ये जातीपातीचे राजकारण करून सामाजिक तेढ निर्माण करू नका-दशरथ वनवे

 

शिरूर

in article

गेल्या तीस वर्षात जनतेने भरभरून साथ दिली आहे त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर ग्रामपंचायत मधून अजूनही पंधरा वर्षे हटणार नसल्याचे प्रतिपादन जय नागनाथ ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते दशरथ दादा वनवे यांनी केले.ते जय नागनाथ ग्रामविकास पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.या वेळी व्यासपीठावर सरपंच पदाच्या उमेदवार सुमनबाई रामराव नागरगोजे यांच्यासह आदीनाथ नागरगोजे,जयसिंग शिरसाट,पाखरे,पवार यांची उपस्थिती होती.या वेळी पुढे बोलताना दशरथ दादा वनवे म्हणाले की,माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी प्रचारासाठी लोकं आलेले आहेत.जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद असून मानूरची ओळख मानूर म्हणूनच राहायला पाहिजे.गावात अठरापगड जातीचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने राहत असून केवळ राजकारणासाठी समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम कोणी करू नये असे आवाहन त्यांनी केले.मानूरचा विकास केला नसता तर लोकांनी मला तीस वर्षे कशासाठी निवडून दिले असा प्रतिप्रश्न करत काही टग्यांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिली नसल्याचे सांगितले.विरोधकांनी सांगितले की,नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे गावात विकासकामे करता आली नाहीत.परंतु विरोधकांनीच दुसऱ्या गावात तीस टक्क्यांनी कामे विकून गावाचा विकास केला नाही.घरकुलांचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर पडलेले असून गावात रस्त्यांची कामे,पेव्हर ब्लॉक,सभामंडपाची कामे केली आहेत.शिवाय विहिरींची आणि शेततलावांची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली असून माझं संपूर्ण कुटुंब गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटत आहे.काही लोक विनाकारण माझ्यावर आरोप करून शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करत असून त्या लोकांनी माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.माझ्या आयुष्यात शपथेच राजकारण मी कधीच केले नाही.खोट्या शपथा घेऊन देवाधर्माला कोड्यात न टाकण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.अंजना वनवे बोलताना म्हणाल्या की,जनता आमच्या बाजूने आहे.आमच्या कार्यकाळात सातशेपेक्षा जास्त घरकुल मंजूर झाली आहेत.शिवाय जनतेचा एकही रुपया खाल्ला नाही.जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही बदल केला पण त्या बदलाचा सर्वसामान्य जनतेसाठी कोणता उपयोग झाला असा प्रश्न करत गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपल्या सासऱ्यांनी आयुष्य खर्ची केले असल्याचे त्यांनी सांगितले.आदीनाथ नागरगोजे बोलताना म्हणाले की,मी वनवे दादांशी एकनिष्ठ राहिलो म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली आहे.आपल्या हातात सत्ता द्या ग्रामपंचायतचा कारभार प्रामाणिकपणे करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यापुढे जनतेचा शब्द अंतिम मानून जनतेचीच सेवा करण्याचा निर्धार व्यक्त करत आपल्या पॅनल मधील सर्व सहकाऱ्यांना विजयी करण्याचे आवाहन देखील केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश नागरगोजे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here