बीड लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास 18 पासून प्रारंभ

 

बीड,

in article

Beed loksabha nomination  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू असून 39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे हे नामनिर्देशन अर्ज उमेदवाराने सजगतेने तसेच परिपूर्ण भरावे अशा सूचना, जिल्हादंडाधिकारी आणि दीपा मुधोळ मुंडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

आज नियोजन सभागृहात सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीदरम्यान जिल्हादंडाधिकारी यांनी सूचना केल्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे उपस्थित होते. जिल्हा निर्णय निवडणूक अधिकारी पुढे म्हणाल्या, 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. याच दिवसापासून 11 ते 3 पर्यंत दिनांक 25 एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील.

अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी 12.500 हजार रुपये अनामत रक्कम आहे तर सामान्य वर्गातील सदस्यांसाठी 25000 रुपये अनामत रक्कम आहे. अनामत रक्कम जमा करून नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढे शपथ घेणे आवश्यक असल्याचे माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र नमुना 26 हा देखील सादर करणे आहे याची वेळ 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत असणार आहे. शपथ पत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथ पत्र सादर करण्याची दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजे पासून असणार आहे. याच दिवशी मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे. फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणे आहे.

 

नामनिर्देशन पत्राची छाननी करण्याची तारीख 26 एप्रिल सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल सायंकाळी तीन वाजेपर्यंत असणार आहे.
नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप केले जाईल त्यासह जे उमेदवार अपक्षरीत्या उभे होतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल.

 

उमेदवार त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या सुविधा वेब पोर्टल दिलेले आहे याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल केल्यावर त्याची एक प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष देण्यात यावी, असेही यावेळी सांगितले.

यापूर्वी बँकेच्या प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवारांना नवीन बँक खाते उघडाण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हे बँक खाते नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दोन दिवसाआधी उडावे लागते. प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा असून होणारा सर्व खर्च या नवीन उघडलेल्या बँक खात्यात दाखवावे लागतात. नामनिर्देशन पत्रात जोडलेले छायाचित्र हे तीन महिन्यापेक्षा जुने नसावे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. उमेदवारावर काही गुन्हे असल्यास त्याची माहिती वर्तमानपत्राद्वारे देण्यात यावी व त्याची प्रत ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावी अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली. अपक्ष उमेदवारासाठी 10 सूचक हवे असतात ज्यांची उमेदवारी ही त्याच मतदारसंघातली असावी. राजकीय पक्षांनी उभे केलेले उमेदवार यांचे खर्च चा ताळमेळ ठेवण्यासाठी इलेक्शन एजंट आणि एक्सपेंडिचर एजंट असे नेमावे आणि वेळोवेळी झालेला खर्च हा निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नोंदवहीत नोंदवण्यात यावा याबाबतची प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जेणेकरून त्या त्यावेळी झालेला खर्च हा त्या त्या खात्यात देण्यात येईल अशी ही माहिती यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आण समाज माध्यमांसाठी उमेदवारांनी दिलेल्या जाहिराती या माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून प्रसारित करणे गरजेचे आहे. उमेदवारांनी त्यांचे सामाजिक माध्यमे जसे फेसबुक इन्स्टा ग्राम ट्विटर अन्य काही असल्यास त्याची माहिती नामनिर्देशन पत्रात द्यावी व्यक्तिगतरी त्या स्वतःचा प्रचार करण्यास उमेदवारांना मुभा असून त्यांच्यावतीने इतरांनी प्रचार केल्यास त्याचा खर्च हा उमेदवाराच्या खर्चात जमा करण्यात येईल.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 अन्वे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे राजकीय पक्षाच्या लोकप्रिय नेत्यावर झालेल्या खर्चाची संबंधित कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल याची दक्षता राजकीय पक्षांनी घ्यावी, असे यावेळी सांगितले. एकूण बीड जिल्ह्यासाठी घेण्यात येणाऱ्या परवानग्या या सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी बीड यांच्याकडून मिळतील तर त्या त्या विधानसभा मतदारसंघातील परवानगी या त्या विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी यांच्याकडून दिल्या जातील अशी ही माहिती यावेळी देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील नामनिर्देशन पत्र संदर्भातली कारवाई निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी हे करतील तर टपाली मतदाना संदर्भातली कारवाई उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी हे करतील अशी ही माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here