SCO Film Festival शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाचा मुंबईत शुभारंभ

SCO Film Festival 
SCO Film Festival 

 

 

in article

SCO Film Festival मुंबईच्या एनसीपीए सभागृहात चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत आणि भारताच्या वैविध्यतेचे दर्शन घडवणाऱ्या बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या सुंदर संध्याकाळी आज शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची अत्यंत दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली.

भारतीय चित्रपटसृष्टीतील तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील लोकप्रिय चित्रपट कलावंतासह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.

 

उद्घाटन समारंभासाठी उपस्थित मान्यवर पाहुणे,  अभिनेत्री हेमामालिनी आणि अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, साजिद नाडियाडवाला, ईशा गुप्ता, पूनम ढिल्लों,  एली अवराम,  हृषिता भट्ट आणि जॅकी भगनानी यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचे सात ज्युरी सदस्य – चीनच्या चित्रपट दिग्दर्शक निंग यिंग; कझाकस्तानमधील संगीतकार दिमाश कुडैबर्गेन; किरगिझस्तानमधील चित्रपट निर्मात्या आणि चित्रपट समीक्षक गुलबरा तोलोमुशोवा; रशियन चित्रपट निर्माता आणि पत्रकार इव्हान कुद्रियावत्सेव; ताजिकिस्तानचे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि लेखक मेहमेदसैद शोहियोन; उझबेकिस्तानचे अभिनेते मेहमेदसैद शोहियोन आणि ज्यूरीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता राहुल रवैल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव, चित्रपट निर्मात्यांना अनोख्या संधी आणि नेटवर्क, सहयोग यासाठी अपार शक्यता त्याचबरोबर जगातले सर्वोत्तम चित्रपट अनुभवण्याची संधी देतो, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर स्वागतपर भाषणात सांगितले.

एससीओचे भारताचे अध्यक्षपद दर्शवण्यासाठी एससीओ चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि एससीओशी संबंधित देशांमधल्या चित्रपटांचे वैविध्य आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैली यांचे दर्शन घडवणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपट विषयक भागीदारी उभारणे, कार्यक्रमांची देवाण-घेवाण, चित्रपट निर्मितीमधल्या युवा प्रतिभेची जोपासना आणि या अनोख्या प्रांतामधल्या संस्कृतीना जोडण्यासाठी दुवा म्हणून काम करणे हा उद्देशही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकतेची भावना, चित्रपट कलेला प्रोत्साहन, चित्रपट विषयक भागीदारी यासह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट जगत, उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि एससीओ देशांमधल्या सिनेप्रेमीना हा चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपट विषयक एकत्रित अनुभव देणे हा एससीओ आणि एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांचा हेतू आहे. नेटवर्क निर्मितीसाठी वेग देणे आणि भारतीय चित्रपटांना अधिकाधिक वाव मिळावा हे या एससीओ चित्रपट महोत्सवाच्या केंद्रस्थानी असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी सांगितले.

एससीओच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात हा महोत्सव म्हणजे सळसळत्या संस्कृती, नितांत सुंदर संवेदनशीलता आणि निखळ सिनेमाविषयक अनुभव यांचा सुंदर मेळ घालण्यासाठी भारताची सज्जता झाली आहे. समकालीन प्रासंगिक समस्या यावर चर्चा करण्यासाठी या मंचाचा उपयोग व्हावा ज्यायोगे सध्याच्या शतकातल्या आणि आपल्या लोकांच्या वास्तवाचे अचूक दर्शन चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला घडेल असे त्यांनी सांगितले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) प्रदेशातील सिनेमा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “SCO प्रदेश हा विविध संस्कृतींचा संगम आहे आणि कला आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरांचा उगम आहे.  SCO च्या सदस्य देशांमध्ये बनवलेल्या चित्रपटांमध्ये हे प्रतिबिंबीत झालं आहे आणि यांचं जागतिक स्तरावर कौतुक आणि सन्मान झाला आहे.” “वर्षानुवर्षे चालत आलेलं आपलं लोकजीवन, संस्कृती आणि परस्पर सहकार्य यांचं दर्शन घडवणारे चित्रपट, आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि एकत्र मिळून तयार केले पाहिजेत,”असं त्यांनी SCO च्या सदस्यांना आवाहन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये मुंबईत भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाष्य केलं होते की, चित्रपट आणि समाज हे एकमेकांचं प्रतिबिंब आहे. तुम्ही चित्रपटांमध्ये जे पाहता ते समाजात घडत असतं आणि समाजात जे घडतं ते चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या या टिप्पणीचीहीं यावेळी आठवण करून दिली.

 

देशाची समृद्ध संस्कृती, ठेवा, वारसा, आशा आणि स्वप्ने, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि संक्रमणावस्थेत असलेल्या देशाची कालातीत वाटचाल यांचा चित्रपट संगम साधतो आणि त्याला सूत्रबद्ध आकार देतो, अशा शब्दात मंत्र्यांनी चित्रपटाची महती सांगितली. “चित्रपट खऱ्या अर्थाने समाज, संस्कृती, व्यवस्थेतील विरोधाभास यांचा अर्क टिपतो आणि आपल्या सामूहीक विवेकाचं प्रतिबिंब चित्रपटाच्या अनेक अंगांमधून दाखवतो”, असं ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here