11 फेब्रुवारी रोजी बीड येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मोर्चाचे आयोजन

 

 

in article

अंबाजोगाई ,

Dhangar aarakshan morcha धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज बांधव लढा देत आहेत. याप्रश्नी विविध माध्यमांतून यशवंत सेनेच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ११ फेब्रुवारी २०२४ रोजी बीड येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी अंबाजोगाईत रविवार, दिनांक २८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.

यशवंत सेनेच्या वतीने अंबाजोगाई येथील “अंबारी” शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी सांगितले की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाने सातत्याने विविध प्रकारची अनेक आंदोलने करून ही महाराष्ट्र राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षण मागणी संदर्भात उदासीन आहे. सरकारने १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे हा अंतिम इशारा देण्यासाठी बी.के.कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी बीड येथे “धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळाव्या”चे आयोजन केले आहे. तसेच धनगर समाजाच्या घटनात्मक मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून यशवंत सेनेच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहोत. आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यापूर्वी श्रीक्षेत्र चौंडी येथून धनगर आरक्षण दिंडी काढण्यात येणार आहे. तसा निर्धार आम्ही केला आहे अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यशवंत सेनेचा बीड येथील इशारा मेळावा व मुंबईतील उपोषण आंदोलन संदर्भात दोडतले यांनी सांगितले की, राज्यातील दोन क्रमांकाची लोकसंख्या असलेला धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी यापूर्वी व सध्या देखिल विविध प्रकारची आंदोलने करीत आहे. केवळ धनगर – धनगड अशा मानवी चुकांचा आधार घेत येथील प्रत्येक राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला घटनात्मक आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी गतवर्षी यशवंत सेनेने सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीक्षेत्र चौंडी येथे २१ दिवसांचे आमरण उपोषण केले. त्यावेळी राज्य सरकारने ५० दिवसांत आरक्षण देण्याची लेखी हमी दिली. परंतु, चार महिन्यानंतर अद्याप ही राज्य सरकार धनगर आरक्षण अंमलबजावणी संदर्भात काही ठोस निर्णय घेत नाही. धनगर समाजाबद्दल उदासीन असलेल्या अशा शासनाला जाग यावी यासाठी यशवंत सेनेच्या वतीने दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी बीड येथे “धनगर आरक्षण अंतिम इशारा मेळाव्या”चे आयोजन केले आहे. धनगर समाजाच्या मागणीबाबत दुजाभाव करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या दारात आझाद मैदानावर दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दोडतले यांनी दिली. या दोन्ही आंदोलनाच्या उद्रेकास सरकार जबाबदार राहील असा सुचक इशारा ही दोडतले यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय संघटक जी.बी.नरवटे, राष्ट्रीय सरचिटणीस अण्णासाहेब रूपनवर, राष्ट्रीय सचिव बाबासाहेब भोजने, प्रदेश मुख्यसचिव नितीन धायगुडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील, प्रदेश सचिव सुरेश बंडगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप गडदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक किरण धालपे, दत्तात्रय काळे, वसंत शिंपले आदींसह यशवंत सेनेचे विविध पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here