*लाभावीण प्रीती करणारी आभाळमाया!…*

देखणे आणि टोलेजंग वाडे हे अकोल्यातील चिरेबंदी परिसराचे खास वैशिष्ट्य. यातल्या टाकळकरवाड्यात समईतल्या वातीप्रमाणे तेवत असलेली प्रमिला टाकळकर नावाची प्राणज्योत आज विझून गेली. कोणत्याही मंदिरात मूर्तीचे असते ना तसे वाड्यात आईंचे स्थान होते. तिथली चैतन्यमूर्ती आज अनंताच्या प्रवासाला निघून गेल्यामुळे चिरेबंदी वाडा नावाचे मंदिर सुने सुने भासत आहे. आपल्या अगत्यशील स्वभावाने आणि आश्वासक अस्तित्वाने वाड्याला सतत नांदता ठेवण्याची किमया त्यांना साधली होती. अनेकांवर आईप्रमाणे छायाछत्र धरणारी ही आभाळमाया गेल्याने आपण पोरके झालो, अशी अनेकांची भावना आहे.

पंचवीस वर्षांपासून वाड्यात माझे येणे जाणे आहे. लोकसत्ताचे वार्ताहर आणि माझे स्नेही, मार्गदर्शक प्रकाश पुरुषोत्तम टाकळकर यांचे हे निवासस्थान. सरांचे वडील पुरुषोत्तम टाकळकर हाडाचे सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या हयातीत कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचा वाड्यात राबता असे. अडचणींचे निराकरण करवून घेण्यासाठी अनेकजण त्यांच्याकडे येत. त्यांच्या निधनानंतर प्रमिला मामी(आई) आणि प्रकाश टाकळकर सरांनी हा वारसा नेटाने चालवला. टाकळकर दाम्पत्य मामा आणि मामी नावाने सुपरिचित.

in article

पत्रकार असो किंवा तालुक्यातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक अशा कितीतरी लोकांसाठी वाड्याची कवाडे सताड खुली असत. विशेषत: अकोले तालुक्यातील पत्रकार मंडळींसाठी हा वाडा हक्काचे घर होता, आहे. इथल्या चर्चा उपयुक्त ठरल्या आहेत. आम्ही गमतीने वाड्याला ‘विद्यापीठ’ म्हणत असू. वाड्यात प्रवेश केल्यानंतर पायऱ्या चढून माडीवर गेलो की पहिली खोली आईंची. खिडकीतून त्यांची नजर असायची. त्यांची ख्यालीखुशाली विचारून मग पुढे जायचे. त्यांना न भेटता, बोलता आपण घाईघाईने पुढे सरांना भेटायला गेलो तर आई प्रेमाने टोकणार. कणखर आवाज, काटक शरीरयष्टी. प्रेमळ तरीही करारी, शिस्तशीर स्वाभिमानी बाणा. त्यांच्या बोलण्यातल्या लकबी विशेष होत्या. टाकळकरवाड्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांची अत्यंत आस्थेने विचारपूस करत असत. बहुतेकांशी त्यांचं जवळकीचं नातं होतं. कमालीच्या अगत्यशील होत्या आई. जेवणाची वेळ टाळून चालली असेल आणि तुम्ही बिनजेवणाचे आहात, हे आईंना समजलं तर जेवण केल्याशिवाय बाहेर पडता येणे अशक्य. चहा-नाश्त्याशिवाय क्वचित कोणी वाड्याबाहेर पडत असेल. अत्यंत आनंदाने न थकता त्या हा ‘पाहुणचार’ करायच्या. अलीकडच्या काळात अत्यंत दुर्मिळ झालेले निर्व्याज आणि निरलस प्रेम माझ्यासह कितीतरी लोकांनी अनुभवले आहे. जुन्या काळातल्या आठवणी सांगताना त्या स्मरणरंजनात हरवायच्या. अनेक संदर्भ त्यांना नेमके माहिती होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर हे त्यांचे माहेर. तिथून त्यांचे कुटुंब वारी कान्हेगावला स्थलांतरित झाले. अगदी सुरुवातीच्या काळात साखर कामगारांच्या संघटनेचे काम जवळून बघिलते. गंगाधर उगले, किशोर पवार अशा कामगार नेत्यांचा आणि समाजवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. विवाहानंतर अकोल्यात आल्यावरही पुढे दीर्घकाळ तो टिकून राहिला. भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांनी कधीही आपपरभाव केला नाही. कार्यकर्त्या म्हणून त्या विशेष सक्रीय नसल्या तरीही महिलांना संघटीत करून त्यांनी महिला मंडळ सुरु केले. त्यांच्या बिछान्यावर वृत्तपत्रे आणि पुस्तकं पडलेली असत. अत्यंत बारकाईने वृत्तपत्रे वाचत असत. पाऊस आणि पीकपाणी हे त्यांच्या आवडीचे विषय. जाता जाता राजकारणावर एखादी टिपण्णी करत. एकदम अपडेट असायच्या त्या. ‘आजची बातमी जोरदार आहे, पहिल्या पानावर आहात तुम्ही’, ‘लेख वाचला बरं मी, माझं लक्ष असतं,’ ‘आजचा फोटो सुंदर आलाय…’ वाड्यात प्रवेश केला की आईंची अशी उत्स्फूर्त दाद मिळायची! संगणक इंटरनेट आलेले नव्हते. तेव्हा सरांकडे फॅक्स मशीन होते. आम्ही बातमीचे फॅक्स करायला घरच्यासारखे वाड्यात जायचो. या कुटुंबातले कोणीही आम्हाला बघून वैताग व्यक्त करताना दिसले नाहीत. वाडा आणि परिसर जितका विस्तारलेला होता त्याहून वाड्यातल्या लोकांचे अंत:करण जास्त विशाल होते, याची प्रचीती वेळोवेळी येत राहिली.

दरवर्षी संक्रांतीला तिळगुळ घ्यायला वाड्यात जायचो. तिळगुळाची पोळी आईंनी स्वतः बनवलेली असायची. तिची गोडी काय वर्णावी? चिरंजीव अगस्तीवर त्यांचा भारी जीव. ‘खायला दिलं की मुलांनी खायचं. नाही म्हणायचं नाही,’ असा आईंचा खाक्या! ‘आमची सुनबाई कशी आहे?‘ म्हणत मीनलची आठवण काढायच्या. मध्ये दोन वर्षे आम्ही संगमनेरला रहायला गेलो. येणेजाणे कमी झाले. त्यांना हे खटकायचे. त्या बोलून दाखवत. ‘पुढच्या क्षणाला सगळे आनंदात आहात ना? मग बास….’ असे म्हणायच्या.

वाड्यात खोल्या होत्या. भाडेकरूंना मामींचा मोठा आधार वाटे. आदरयुक्त दरारा असायचा. अनेक भाडेकरू आपल्या आठवणी सांगतात. इतक्या वर्षांनंतरही आईंविषयी अत्यंत आदर असतो त्यांच्या बोलण्यात. चारेक वर्षापूर्वी सरांनी बंगला बांधला. वाडा संस्कृतीत रमलेल्या आई बनल्यात न येता अखेरपर्यंत वाड्यात राहिल्या. त्या बंगल्यात आल्या नाहीत आणि लेक आणि सुनेने त्यांना उगीच आग्रह केला नाही. वयाच्या ९२व्या वर्षापर्यंत स्वतःची कामे स्वतः करत. परावलंबी असणे त्यांना रुचत नव्हते. अगदी पाय घरून त्या घरात पडल्या त्या दिवशी सकाळचा चहा त्यांनी स्वतः केला होता. सून रोहिणी, नात मुग्धा आणि टाकळकर सरांनी आईंची मनोभावे सेवा-शुश्रुषा केली. काळजी घेतली. आई घरात आहे, म्हणून पासष्टी ओलांडलेला हा मुलगा बाहेर मुक्कामी थांबत नसे. आई वडलांबाबतचा आदर कमी होतानाचे दारूण चित्र समाजाचे चरित्र बनत चाललेले असताना मायलेकांचे नाते उठून दिसायचे, नजरेत भरायचे. मुलगी प्रतिभा आणि मुलगा प्रशांत यांच्याविषयी आईंच्या बोलण्यात यायचे. टाकळकरांच्या ‘विस्तारित कुटुंबा’तील सगळ्यांचीच आई होती ही. कोणाविषयी तिरस्कार किंवा द्वेष त्यांच्या तोंडून व्यक्त झाल्याचे आठवत नाही. एकदम निगर्वी व्यक्तिमत्त्व.

टाकळकरांच्या ‘विस्तारित कुटुंबा’तील कोणाच्याही यश-कौतुकाची बातमी ऐकून त्या हरखून जात. इतरांच्या दु:खात सुख शोधणाऱ्या लोकांची भोवती कमी नाही. अशा काळात ‘लाभाविण प्रीती’ करणाऱ्या कळवळ्याच्या जातकुळीतल्या होत्या आई! जुन्या पिढीचा डीएनए तोच होता. आप्पलपोटेपणा त्यांच्या ठायी अजिबात नव्हता असे नाही. स्वार्थाच्या उधळणाऱ्या उन्मत्त वारूला लगाम घालून, त्याला काबूत ठेवायची क्षमता ती पिढी बाळगून होती. पुढे पुढे काळाचा महिमा बदलत गेला. पैसा मोठा झाला तसतशी माणसे खुजी होत गेली. या पृष्ठ्भूमीवर आईंची उंची लक्षात येते. जगायला शिकवणारी अशी माणसं आपल्यातून निघून जाणं, ही मोठी हानी आहे. वाड्यात जाणेयेणे सुरु राहील. मात्र निर्व्याज आणि निरलस प्रेम करणारे, तोंडभरून बोलत अत्यंत आस्थेने विचारपूस करणारे, कान पकडणारे तिथले एक माणूस आयुष्यभर दिसणार नाही. ‘मूर्तीशिवाय मंदिर बघणं’ हा अनुभव जीवाला जाळत राहील. आभाळमाया असलेल्या आईंनी दिलेले संस्कार मात्र सोबत करत राहतील सदैव.

भाऊसाहेब चासकर, अकोले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here