‘परिचारिके’ने घडविले संगमनेरातील ‘नातेवाईकांचे’ लसीकरण!

अकोले  (वार्ताहर )

 

in article

अकोले तालुक्यात कार्यरत असलेल्या संगमनेरातील एका परिचारिकेने शासकीय आरोग्य केंद्रातून व्हॅक्सिनच्या तब्बल पाच वायल घरी आणून परस्पर आपल्या नातेवाईकांसह इतरांचे लसीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरची परिचारिका अकोले तालुक्यात दुर्गमभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत संबंधित परिचारिकेवर कोणतीही कारवाई झाल्याची माहिती नाही. विशेष म्हणजे चार/पाच दिवसांपूर्वीच्या या घटनेबाबत अकोले तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी अद्यापही अनभिज्ञ असल्याचा धक्कादायक प्रकारही यातून समोर आला आहे.

संगमनेर  माधव चित्र मंदिराच्या परिसरात राहणारी एक परिचारिका अकोले तालुक्यातील आरोग्य विभागात कार्यरत आहे. गेल्या चार/पाच दिवसांपूर्वी संबंधित महिलेने आपल्या वरीष्ठांना अंधारात ठेवून तिच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी आलेल्या लसीकरणाच्या काही वायल (बाटल्या) परस्पर सोबत आणल्या आणि त्यातून आपल्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य नातेवाईक व परिसरातील काही जणांचे लसीकरणही केले. संबंधित परिचारिकेची ही कृती बेकायदा आणि अत्यंत धक्कादायक स्वरुपाची आहे. अकोले तालुका हा दुर्गम आदिवासी बहुल आहे. या तालुक्यातील बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्र अशाच दुर्गमभागात आहेत. त्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब व आदिवासी नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जात असतात. आत्तापर्यंत तालुक्याच्या आरोग्य विभागाने अपूर्‍या आरोग्य सुविधा असतांनाही प्रशासनाच्या बरोबरीने उत्तम काम केले आहे. मात्र एकीकडे आदिवासी नागरिकांच्या उत्थानासाठी चांगले काम होत असताना आदिवासी भागातील अशिक्षित, गरीब नागरिकांसाठी आलेल्या व्हॅक्सिन अशा परस्पर लंपास करण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे.

      सदर परिचारिकेने अकोल्यातून पाच वायल (एका वायलमधे लशीचे दहा डोस असतात) अकोल्यातील कोणत्याही वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संमतीशिवाय परस्पर संगमनेरात आणल्या आणि लसीकरणाबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करुन, कोणतीही अधिकृत नोंद न करता आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्याचे डोस दिले. हा प्रकार बेकायदेशीर आणि एकप्रकारे गुन्हेगारी विचाराचा आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील ज्याभागातील नागरिकांचा त्या लशींवर हक्क होता तो हिरावला गेला आहे. सदरचा प्रकार यशस्वी करण्यासाठी त्या

     याबाबत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता झालेला प्रकार गंभीर आहे मात्र अद्याप आमच्यापर्यंत तपशील आला नाही चौकशी केली जाईल  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभिरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांना असा कोणताही प्रकार घडल्याचीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकरणात सुरुवातीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील एका परिचारिकेचे नाव समोर आले होते, त्यावरुन स्थानिक प्रशासनाने त्या परिचारिकेची खरडपट्टी काढली. तिनेच या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावला व स्थानिक अधिकार्‍यांसमोर वास्तव चित्र उभे केले.याबाबत संगमनेरच्या स्थानिक प्रशासनाने अकोल्याच्या प्रशासनालाही कळविले, मात्र त्यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदार उपलब्धच झाले नाहीत, तर तालुका वैद्यकीय अधिकारी या प्रकरणाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकरणाने संगमनेरसह अकोल्यातही खळबळ उडाली आहे.

फेब्रुवारीत कोविड संक्रमण जवळपास संपल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरण सुरु केले होते. मात्र देशातील काही राजकीय पक्ष व व्यक्तींनी भारतीय बनावटीच्या लशींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण केल्याने लसीकरणात सामान्य नागरिकांचा उत्साह दिसून आला नाही. मात्र दुसर्‍या संक्रमणात अचानक रुग्णसंख्येचा डोंगर उभा राहण्यासोबतच मृत्यूचे आकडेही वाढू लागल्याने देशातील लसीकरणाला अचानक मागणी वाढली आणि भल्या पहाटेपासूनच लसीकरण केंद्राबाहेर वयोवृद्ध नागरिकांसह 45 वर्षांवरील सर्वांनी गर्दी करायला सुरुवात केली आणि देशातील लसीकरणाचे व्यवस्थापनच कोलमडले ते आजही सुरळीत होवू शकलेले नाही.

असे असतानाही दुसरीकडे आपल्या अधिकारांचा बेकायदा वापर करुन चक्क नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या लशी परस्पर कोणत्याही वरिष्ठाच्या परवानगीशिवाय गुपचूप घरी आणून आपल्या कुटुंबियांसह नातेवाईकांचे लसीकरण करण्याचा संपूर्ण देशातील बहुधा हा पहिलाच प्रकार समोर आल्याने संगमनेरसह अकोल्यातून संताप व्यक्त होत आहे. अकोल्याच्या प्रशासनाने या घटनेची गांभिर्याने नोंद घेवून त्यामागील संपूर्ण सत्य समोर आणण्याची आणि दोषी असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा हा प्रकार अन्य आरोग्यसेवकांसाठी ‘आदर्श’ ठरुन देशात, राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात अव्यवस्था निर्माण होईल याचे स्मरण ठेवण्याची गरज आहे. अशा प्रकारातून सामान्य नागरिकांच्या संयमाचा बांध फुटून नागरी उद्रेक होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here