भारताचा ऐतिहासिक विजय! रणरागिणींनी वर्ल्ड कप जिंकून रचला नवा इतिहास

नवी मुंबई :

भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच महिला वनडे वर्ल्ड कप जिंकत विश्वविजेतेपद पटकावले. फायनल सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला.

या सामन्यात तरुण खेळाडू शेफाली वर्मा ही खरी ‘गेम चेंजर’ ठरली. तिने ८७ धावांची शानदार खेळी केली आणि गरजेच्या क्षणी गोलंदाजीतही दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तिच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने २९८ धावा उभारल्या आणि अखेर विजयी ठरला.

स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. स्मृती फक्त पाच धावांनी अर्धशतक चुकवले, पण तिच्या ४५ धावांच्या खेळीने भारताला मजबूत पाया मिळवून दिला. त्यानंतर शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी ६२ धावांची भागीदारी करत डावाला स्थैर्य दिले. शेफाली ८७ धावा करून बाद झाली, तर जेमिमाने २४ धावांचे योगदान दिले.

यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी संघाला चांगली साथ दिली. शेवटच्या टप्प्यात रिचा घोष हिने २४ चेंडूंमध्ये ३४ धावा करत संघाचा धावसंख्येचा वेग वाढवला.

दक्षिण आफ्रिकेने २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दमदार सुरुवातीने केला. पण अमनजोतच्या थेट फेकीने पहिली विकेट मिळाल्यावर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली. लॉरा वोल्ववॉर्टने शतक झळकावले, परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

२०१७ साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, परंतु यावेळी रणरागिणींनी ते स्वप्न साकार केले.

सामन्यानंतर स्मृती मानधना भावुक झाली. ती म्हणाली, “वर्ल्ड कप जिंकल्यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. अजूनही हे स्वप्न वाटतंय. घरच्या मैदानावर ‘भारत चॅम्पियन’ हे पाहणं हा माझ्यासाठी अवास्तव क्षण आहे.”

स्मृतीने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि संघाला नेहमीच मजबूत सुरुवात दिली. तिचा वाटा या ऐतिहासिक विजयात सर्वात महत्त्वाचा ठरला.

भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून देशाला अभिमानाचा क्षण दिला आहे. स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारताने अखेर “विश्वविजेते” होण्याचे स्वप्न साकार केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles