शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान

पुणे ,प्रतिनिधि

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी दि. १३ जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती.

या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles