उन्हाचे चटके, पावसाची झोड; तरीही ‘आमची मराठी शाळा’ म्हणत विद्यार्थ्यांची पायपीट


अकोले,ता.१७
Ahilyanagar Akole adiwasi school news “आमची मराठी शाळा… आमची मराठी शाळा…” हे गीत गुणगुणत उन्हाचे चटके सहन करत दररोज पाच किलोमीटरची पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे चित्र अकोले तालुक्यातील दुर्गम भागात पाहायला मिळत आहे.

शिक्षणाची आस आणि शाळेबद्दलचे प्रेम याच्या जोरावर ही बालचमू प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्ञानाची वाट चालत आहे.


पुरुषवाडी, बलठण, वांदुळ शेत, माणिक ओझर, गोंदुषी, खडकी, लव्हाळी, कोथळे, विहीर, शिंदे आणि तळे या दुर्गम आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थी मवेशी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत.

मात्र, या गावांपर्यंत नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने आणि खासगी जीपचे भाडे परवडत नसल्याने विद्यार्थ्यांना रोजचा शाळेचा प्रवास पायीच करावा लागत आहे.


उन्हाळ्यात अंगाची लाही लाही करणारे ऊन, पावसाळ्यात मुसळधार पावसाचा मारा आणि हिवाळ्यात बोचरी थंडी अशा तिन्ही ऋतूंशी झुंज देत ही चिमुकली पावले शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पायात साध्या चपला, पाठीवर दप्तर आणि मनात शिकून मोठे होण्याची जिद्द घेऊन ही मुले शाळेची वाट तुडवत आहेत.


विशेष म्हणजे, अकोले आगाराने राज्यात ‘क’ वर्गात प्रथम क्रमांक मिळविल्याचा मान पटकावला असला, तरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात आजही अनेक गावांना बससेवेची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक खडतर बनला आहे.

गावाच्या आजूबाजूचा परिसर जंगलव्याप्त असल्याने तेथे हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा साधनांविना शाळेत ये-जा करणे जीवघेणे आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन या परिस्थितीकडे शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या भागातील आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, सयाजी अस्वले आणि गंगाराम धिंदळे यांनी विद्यार्थ्यांसाठी बससेवा किंवा अन्य वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


“शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पावलांना आधार देणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. कारण हीच चिमुकली पावले उद्याचा सुशिक्षित आणि सक्षम समाज घडविणार आहेत,” अशी भावनिक प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles