सभासदांच्या विविध सूचनांवर सकारात्मक चर्चा; आर्थिक विषयांना मंजुरी
बीड
beed dcc bank बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २४) बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. पी. कोलवाडकर यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या अधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी दिवंगत अजितदादा पवार यांच्यासह इतर दिवंगत व्यक्ती तसेच शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शंभर टक्के वसुली करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, आर्थिक वर्ष २०२५-२६ चा कामकाज अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, वैधानिक लेखापरीक्षण अहवाल आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. कर्ज परतफेड योजना, पीक कर्ज, व्याजदर आणि कर्जदार सभासदांना सुलभ सुविधा याबाबत सभासदांनी सूचना मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी सभासद आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. सभेला सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, सभासद, पदाधिकारी, गटसचिव, बँकेचे अधिकारी-कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
