मराठवाड्यात ३५ हजार कोटी; महाराष्ट्राचे ८० हजार कोटींचे पीक नुकसान
बीड
beed news rohit pawar beed morcha मराठवाड्यासह महाराष्ट्रातील खरीप हंगामाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून, राज्यातील पिकांचे सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) सरचिटणीस तथा आमदार रोहितदादा पवार यांनी केला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३५ हजार ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या मागण्यांसाठी गुरुवारी त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आ. पवार यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ हजार ८०० कोटी, जालन्यात ५ हजार १५० कोटी, बीडमध्ये ६ कोटी, लातूरमध्ये ३ हजार ८०० कोटी, धाराशिवमध्ये ३ हजार २५० कोटी, नांदेडमध्ये ५ हजार ५०० कोटी, परभणीत ४ हजार कोटी आणि हिंगोलीत २ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे.
अतिवृष्टी, पावसातील खंड आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक भागांत शेतजमीन खरडून गेल्याने आगामी हंगामासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची व्याप्ती लक्षात घेऊन शासनाने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत द्यावी. पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्यावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावेत, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली.
