Homeताज्या बातम्यामाध्यम स्वातंत्र्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बीड मध्ये निदर्शने

माध्यम स्वातंत्र्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बीड मध्ये निदर्शने

बीड

Beed news agitation नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांना अडवणे, त्यांना ताब्यात घेणे, पोलिसांकडून मारहाण व दडपशाही केल्याचे आरोप तसेच आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी गैरवर्तन, प्रेस कार्ड दाखवुनही ताब्यात घेऊन गाडीत टाकणे या माध्यमांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दि.१२ सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आणि माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करत, सरकारच्या अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी ‘हुकूमशाही चालणार नाही’, ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ आणि ‘हुकूमशाही सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.

दिल्लीतील आंदोलनकर्त्यांची अडवणूक केल्याचा आरोप

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे दि. १० ऑक्टोबर २०२६ पासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांतून दिल्लीकडे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रेल्वे आणि रस्त्यांवर अडवून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.

तसेच रेल्वे सेवा आणि मेट्रो स्थानके बंद करणे, दिल्लीतील इंटरनेट सेवा खंडित करणे आणि आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून मारहाण व दडपशाही करणे, अशा घटनांमुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पत्रकारांशी गैरवर्तन केल्याचा निषेध

आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही गैरवर्तनाला सामोरे जावे लागल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. अधिकृत प्रेस कार्ड दाखवूनही पत्रकारांना बळजबरीने ताब्यात घेऊन वाहनात बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पत्रकारांना निर्भयपणे वार्तांकन करता यावे, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे आणि पत्रकारांशी सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी, अशी मागणी निदर्शकांनी केली.

निदर्शनांत विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, रामनाथ खोड, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, शहराध्यक्ष सादेक सय्यद, इंटकचे बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके , सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे , प्राचार्य काम्रेड डी.जी.तांदळे (जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा बीड), नितीन जायभाये (अध्यक्ष बीड शहर बचाव मंच), प्रविण आनेराव ( जिल्हाध्यक्ष मायक्रो ओबीसी महासंघ बीड), सामाजिक कार्यकर्ते सरफराज पठाण, गणेश वटारे, माऊली शिंदे,
यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकशाही मूल्ये, संविधानिक अधिकार आणि माध्यम स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, या मागण्यांसाठी निदर्शकांनी आपली भूमिका मांडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments