.
ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा –
श्रीगोंदा शहराच्या जवळ फोटोशूटसाठी गेलेल्या तीन तरुणांवर अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व प्लास्टिक पाईपने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा–वडाळी रस्त्यावर घडली.
हल्लेखोरांनी तरुणांना मारहाण करण्यासोबतच त्यांच्या कडील कॅनोन कंपनीचा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा कॅमेरा, त्याची लेन्स तसेच ३८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याचे समजते.
या प्रकरणी ओम संतोष शिंदे (रा. बुरुडगल्ली, श्रीगोंदा) या तरुण फोटो ग्राफरने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चार अनोळखी व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम शिंदे यांना एका तरुणीने फोन करून तीन मैत्रिणींचे फोटोशूट करण्यासाठी वडाळी रस्त्यावर बोलावले होते. त्यानंतर ओम शिंदे हे आपले मित्र अजय दिलीप बोके (रा. कोकणगाव) व अनिकेत अंबादास धोत्रे (रा. श्रीगोंदा) यांच्या सह ठरलेल्या ठिकाणी गेले.
फोटो शूट सुरू असतानाच विना नंबरच्या काळ्या रंगाच्या बुलेटवरून आलेले दोन तसेच विना नंबरच्या चार चाकी वाहनातून आलेले आणखी दोन अनोळखी इसम तेथे दाखल झाले. त्या चौघांनी शिवीगाळ व दमदाटी करत लाथा-बुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड व प्लास्टिक पाईपने तिघांवर हल्ला केला.
यानंतर हल्लेखोरांनी कॅमेरा, लेन्स व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन घटना स्थळावरून पलायन केले. या मारहाणीत तिन्ही तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिवसा ढवळ्या घडलेल्या या मारहाण व चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
स्रोत: – ( फिर्याद )

