राष्ट्रीय लोक अदालत कोपरगाव न्यायालय जिल्ह्यात प्रथम

राष्ट्रीय लोक अदालत कोपरगाव
राष्ट्रीय लोक अदालत कोपरगाव

राष्ट्रीय लोक अदालतीत कोपरगाव न्यायालय जिल्ह्यात प्रथम

कोपरगाव

in article

राष्ट्रीय लोक अदालत कोपरगाव न्यायालयात १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात ४८७१ खटले निकाली निघाले असून तडजोडीत ५ कोटी ४१ लक्ष ७३ हजार ८४१ रुपयांची वसुली झाली आहे. या माध्यमातून कोपरगांव न्यायालयाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. कोपरगांव तालुक्यातील ७९ गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिरेही घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा न्यायाधीश-१ सयाजीराव को-हाळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन कोपरगाव न्यायालयात करण्यात आले होते. या लोकन्यायालयात दाखलपूर्व व दाखल असे दोन्ही प्रकारची १० हजार ८९३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दाखलपूर्व ८६७५ प्रकरणांपैकी ४७४४ प्रकरणे निकाली काढत २ कोटी ४८ लाख १८ हजार ८३८ रूपयांची वसूली करण्यात आली. दाखल २२१८ प्रकरणांपैकी १२७ प्रकरणे निकाली काढत २ कोटी ९३ लाख ५५ हजार ३ रूपयांची वसूली करण्यात आली.

या प्रसंगी कोपरगांव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-१ व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सयाजीराव को-हाळे, जिल्हा न्यायाधीश-२ भुजंगराव पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-२) महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-३) भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड, सहकार न्यायाधिश ल.मू.सय्यद, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर, कोपरगाव जिल्हा सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे, कोपरगाव जिल्हा सहाय्यक सरकारी वकील शरद गुजर, सहाय्यक सरकारी वकील अशोक टुपके, मनोहर येवले, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे सचिव बंडू बडे, सागर नगरकर, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, न्यायालयीन कर्मचारी अशोक दहिफळे, सुरज माळवदे, सागर गुरसाळे, राहूल बेडके यांचे सह लोकन्यायालयात दाखल केलेल्या विविध खटल्यांचे पक्षकार, वकील, संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकन्यायालयात कोपरगाव न्यायालयाच्या वतीने आठ पॅनल करण्यात आले होते. यात पॅनल प्रमुख,सदस्य, कनिष्ठ लिपिक, शिपाई यांचा समावेश करण्यात आला होता. लोकन्यायालयात फौजदारी प्रकरणे, वाहन अपघात, भुसंपादन प्रकरणे, एन.आय.कायदा १३८ ची प्रकरणे, युनियन बॅंक, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बॅंका व पतसंस्थांची प्रकरणे, ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल. यांची प्रि-लिटिगेशन प्रकरणे,सहकार न्यायालय, तहसिल कार्यालय यांची दाखलपुर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता.

कोपरगावातील ७९ गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती अभियान

मा.सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार देशात कायदेविषयक जनजागृती शिबिरे घेण्यात येत आहेत. कोपरगांव तालुक्यातील ७९ गावांमध्ये ३१ ऑक्टोबर २०२२ ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत कायदेविषयक जनजागृती शिबिरे घेण्यात आली. या माध्यमातून सर्वसामान्यांना कायद्याविषयक जनजागृती सहज व सोप्या भाषेत करण्यात आली. या शिबिरासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, वासुदेव देसले,रोहीदास ठोंबरे व विविध गावांचे ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, नामदेवराव परजणे पाटील विधी महाविद्यालय,आत्मा मालिक एन.डी.ए.,एस.एस.जी.एम.महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले.

”अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियान अंतर्गत न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी, प्रशासनातील सर्व घटक, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय यांच्या माध्यमातून कायदेविषयक जागृती नागरिकांमध्ये प्रभावीपणे करण्यात आली. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात खटले निकाली निघाले. कायदेविषयक सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे‌.” अशी प्रतिक्रिया जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here