Home ताज्या बातम्या Rahuri andolan उपोषण स्थगित; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरता विराम

Rahuri andolan उपोषण स्थगित; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरता विराम

0
149



अहिल्यानगर (प्रतिनिधी) :

Rahuri andolan जंगली प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान, जीवितास असलेला धोका आणि अपुऱ्या शासकीय उपाययोजनां विरोधात करण्यात आलेले उपोषण दि. १५ एप्रिल २०२६ रोजी तात्पुरते स्थगित करण्यात आले. खासदार नीलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी प्रशासनाकडून सकारात्मक व ठोस आश्वासने मिळाल्यानंतर उपोषणाला तात्पुरता विराम देण्याचा निर्णय घेण्यात आला.


सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कुशाबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त पाठिंबा लाभला होता. जंगली प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान, जीवितास असलेला धोका आणि अपुऱ्या शासकीय उपाययोजनांविरोधात हे आंदोलन उभारण्यात आले होते.


या उपोषणादरम्यान पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या : जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथके नेमणे, शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी १०० टक्के अनुदान देणे, हल्ल्यात मृत्यू किंवा जखमी झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून नुकसानभरपाई देणे, तसेच जनजागृती मोहिमा राबवून वन विभाग, पोलीस व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधणे.


सलग सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाला संधी देण्याच्या भूमिकेतून उपोषण स्थगित करण्यात आले आहे.


दादासाहेब पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, दिलेल्या आश्वासनांची निश्चित कालावधीत अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन पुन्हा अधिक तीव्र स्वरूपात छेडण्यात येईल.


दरम्यान, उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वर्पे, किरण कडू, सुधाकर मुसमाडे, नितीन गागरे, भीमराज बेलकर, जालिंदर मुसमाडे, कचरू मुसमाडे, भागवत गागरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच महसूल विभाग, वन विभाग, पंचायत समिती व कृषी विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.


उपोषणाच्या काळात आरोग्याच्या अडचणींचा सामना करत असतानाही दादासाहेब पवार यांनी दाखवलेली चिकाटी, जिद्द आणि संघर्षाची भूमिका याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नागरिकांनीही प्रशासनाने दिलेली आश्वासने तात्काळ पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
एकंदरीत, उपोषण स्थगित झाले असले तरी आंदोलनाची लढाई अद्याप सुरूच असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here