सांधणदरी,मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार्या काजवा महोत्सवाची भूरळ तर चांगल्याचांगल्या व्यस्त असलेल्यांनाही आपल्याकडे खेचून घेणारी असते.
मात्र जेथे प्रकृतीचा चमत्कार असतो, तेथे मानवाने अखंड सावधानता बाळगायलाच हवी असा अलिखित नियमच आहे.
या नियमाला फाटा दिला की अपघाताची शक्यता शंभर टक्के निर्माण होते.
असाच काहीसा अनुभव संगमनेर नगर पालिकेचे विद्यमान बांधकाम सभापती किशोर टोकसे यांना आला.
स्थानिकांचा विरोध झुगारुन सांधणदरी त उतरलेल्या सभापती महोदयांच्या जीवावरच बेतण्याची स्थिती होती.
मात्र वनविभागाच्या अधिकार्यांनी वेळीच मदतीचे दोर फेकल्याने त्यांचा जीव बालंबाल बचावला.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमनेर नगर पालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम विभागाचे सभापती किशोर टोकसे आपल्या परिवारासह बुधवारी (ता.9) भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी गेले होते.
धरणाच्या परिसरात पावसाचे तुषार अंगावर झेलल्यानंतर टोकसे कुटुंब आशिया खंडात एकमेव असलेल्या सांम्रद येथील सांधणदरी च्या दर्शनाला गेले.
यावेळी प्रकृतीचा चमत्कार न्याहाळत असतांना जवळपास दोन किलो मीटरहून अधिक लांबी असलेल्या या दरीत आणखी खोलवर जाण्याचा मोह त्यांना झाला.
मात्र त्याचवेळी मान्सूनची रिपरिप सुरु झाल्याने पुढील धोका ओळखून तेथे उपस्थित असलेल्या काही स्थानिक आदिवासी बांधवांनी त्यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला.
स्थानिकांचा सल्ला हा अनुभवसिद्ध असतो, त्यामुळे अनोळखी ठिकाणी वावरतांना त्याचा सन्मान करणं म्हणजे स्वताचीच सुरक्षितता करण्यासारखं समजलं जातं.
मात्र सभापती महोदयांनी स्थानिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन उत्साहाच्या भरात सांधणदरी येथे जाण्याचा अट्टाहास केला आणि तो त्यांच्या अंगलट आला.
दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास या संपूर्ण परिसरात मान्सूनच्या पावसाने फेर धरल्याने सांधण दरीतील पाण्याची पातळी वाढू लागली. त्यामुळे सभापती आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांभोवती पाण्याचा वेढा पडला.
त्यातच भंडारदर्याचा पाऊस म्हणजे एकदा सुरु झाला की मग त्याला थांबणं माहितीच नसावं असा असतो.
त्यामुळे काही मिनिटांतच सांधणदरी तील पाण्याची पातळी वाढू लागल्याने सभापती टोकसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा जीवच धोक्यात आला होता.
तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांकडे त्यावेळी बचावासाठीचे कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने हे भयानक दृष्य पाहणार्यांच्या काळजाचे ठोकेही वाढले होते.
त्याचवेळी परिसरातील काहींनी वनविभागाच्या अधिकार्यांना याबाबत माहिती कळविली.
हरिश्चंद्रगड-कळसूबाई वनक्षेत्राच्या वनरक्षक मनिषा सरोदे, गुलाब दिवे, भाऊसाहेब भांगरे यांनी तत्काळ सांधण दरीकडे धाव घेतली.
यावेळी काही स्थानिक पोहणार्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचार्यांनी टोकसे कुटुंबियांपर्यत दोर पोहोचवला व त्या सर्वांना मृत्यूच्या ‘ओढ्यातून’ सहिसलामत ‘ओढूनच’ बाहेर काढले.
जर तेथे कोणी स्थानिक नागरिक नसता तर मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता. मात्र टोकसे परिवाराचे दैवबलवत्तर होते म्हणून स्थानिकांसह वनविभागाने तत्परता दाखवून त्यासर्वांचे जीव वाचवले.
सदरचे बचावकार्य सुरु असतांना स्थानिकांसह पर्यटकांचीही तेथे मोठी गर्दी झाली होती.