9 नोव्हेंबरला राज्यव्यापी मूक मोर्चा : शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनांचे आवाहन

अहिल्यानगर | प्रतिनिधी


टीईटी सक्ती : सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ (Teacher Eligibility Test) अनिवार्य ठरविल्यानंतर राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी शिक्षक संघटनांची मागणी असूनही सरकारकडून अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शिक्षकांचा मूक मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

✦ शिक्षक संघटनांचे आवाहन

मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या मोर्चाद्वारे शासनाला शिक्षकांचा रोष व न्याय्य मागण्या दाखवून दिल्या जाणार आहेत.

✦ नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता : तरीही अन्याय

संघटनांच्या माहितीनुसार, 1990 ते 1993 दरम्यान प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत स्वतंत्र परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार शिक्षकांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद शिक्षण सेवक समिती मार्फतही पारदर्शक पद्धतीने भरती करण्यात आली.
2008 ते 2010 दरम्यान सीईटी परीक्षेद्वारे, तर 2013 पासून एनसीटीईच्या मार्गदर्शक तत्वांनुसार टीईटी पात्रतेच्या आधारावर शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

13 फेब्रुवारी 2013 च्या शासन निर्णयानुसार, त्या तारखेपूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीची सक्ती नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. तरीदेखील, आरटीई कायद्याच्या चुकीच्या व्याख्येमुळे शिक्षकांना अन्यायकारकपणे पात्रता परीक्षा देण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे.

✦ “फक्त शिक्षकांनाच पुन्हा परीक्षा का?”

शिक्षक संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, इतर कोणत्याही सरकारी केडरला पुनःपात्रता परीक्षा द्यावी लागत नाही, तर मग फक्त शिक्षकांनाच वारंवार परीक्षा द्यावी लागते, हा अन्यायकारक भेदभाव आहे.

✦ ३५ ते ४० संघटनांचा एकत्रित आवाज

राज्यातील ३५ ते ४० प्राथमिक, माध्यमिक आणि खाजगी शिक्षक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, ९ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मूक मोर्चे काढले जातील.
या मोर्चाद्वारे शिक्षक सरकारकडे पुनर्विचार याचिकेची मागणी आणि टीईटी सक्तीविरोधातील भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त करणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles