शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प – आमदार राम सातपुते
मुंबई दि ८ मार्च, प्रतिनिधी
राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत निराशाजनक आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती मात्र पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला असल्याचे मत आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले.
राज्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यामुळे मोठ्या संकटात सापडला आहे, अवकाळीमुळे उध्वस्त झालेला आहे, मात्र त्यांना आधार देण्यासाठी कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात नाही, एवढेच नाही तर कर्जमाफी करण्याची घोषणा केलेल्या या सरकारने तीही पूर्ण केलेली नाही, ज्यांनी वेळेवर कर्ज भरले त्यांना प्रोत्साहन रक्कम देण्यासाठीची तरतूदही यामध्ये केलेली नाही, शेती, शिक्षण, शेतकरी उन्नती आणि सामाजिक विकासासाठी नवे प्रयत्न दिसत नाहीत. कर्जमाफीच्या अपेक्षांवर पाणी सोडलेले दिसत असून महाराष्ट्रातील सर्व जनतेची या राज्याचा अर्थसंकल्प मध्ये घोर निराशा केली आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प फसवा आणि विकासाला अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे. सरकारमध्ये येण्यापूर्वी तिन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या वचननाम्याचा त्यांना विसर पडला आहे. यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही.
युवकांच्या रोजगारासाठी काय? शेतकऱ्यांना उत्पादन मूल्यांसाठी काय? याचे उत्तर यामध्ये दिसत नाही. सामान्य गृहिणी आणि सामान्य माणसांसाठी केवळ मृगजळ या अर्थसंकल्पात दाखवले आहे, याचा मी निषेध करतो. राज्याची दिशाभूल आणि सामान्य माणसांची निराशा एवढंच यातून दिसत आहे असेही आमदार राम सातपुते अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले.
आणखी वाचा :ट्रक रिक्षाच्या धडकेत 5 ठार चार जखमी;दोन बालकांचा समावेश
[…] आणखी वाचा :शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी न… […]