बीड
बीड जिल्ह्यातील केज मांजरसुंबा रोडवर केज पासून २० किमी अंतरावर जोला-सारुळ पाटीवर जनावरांची वाहतूक करणारे पिक-अप आणि टिप्परची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातातील पीक-अप मधील अंबाजोगाईतील भावंडांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर टिप्पर चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या उत्तर प्रदेशातील क्लिनर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हनीफ शौकत कुरेशी (वय २२) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय २०, दोघेही रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) अशी मयत भावंडांची नावे आहेत.
दि. ११ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास नेकनुर येथील आठवडी बाजारातून जनावरे घेऊन जात असलेले पिक-अप क्र. (एम एच ४४/ यू ४३०७) हे अंबाजोगाई च्या दिशेने जात असताना केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या रेणू पेट्रोल पंपाच्या जवळ जोला-सारुळ पाटी जवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव वेगातील भारत बेंझ कंपनीच्या टिप्पर क्र. (एम एच ४४/ यू ९५५७) ने जोराची धडक दिली.
यात पिकअप मध्ये समोर केबिनमध्ये बसलेले हनीफ शौकत कुरेशी, वय (२२वर्ष) आणि त्याचा भाऊ आरेफ शौकत कुरेशी, वय (२० वर्ष) (रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पिक-अपचा चकनाचूर झालेला असून टिप्पर चालक अमोल खंदारे, (रा. कारेगव्हाण ता. वडवणी) आणि उत्तर प्रदेशातील क्लिनर, पप्पू यादव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यात दोन जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे.
