Home ताज्या बातम्या श्रीगोंद्यात महिलेला त्रास देण्याचा प्रकार; विरोध केल्यावर पती ला जीवे मारण्याची धमकी

श्रीगोंद्यात महिलेला त्रास देण्याचा प्रकार; विरोध केल्यावर पती ला जीवे मारण्याची धमकी

0
213

ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा

श्रीगोंदा –

Shrigonda crime श्रीगोंदा शहरात अलीकडच्या काळात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाच एका घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे.

तक्रारीनुसार, दि. ४ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील एका अत्यंत गजबजलेल्या व वर्दळीच्या भागात असलेल्या हॉटेलसमोर ही घटना घडली. संबंधित हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेली एक विवाहित महिला लाल रंगाच्या स्कुटीवरून आली असताना, एका तरुणाने हॉटेलसमोर उभे राहून तिच्याकडे एकटक पाहत तिच्या लज्जेला बाधा पोहोचेल असे वर्तन केल्याचा आरोप आहे.

इतक्यावरच न थांबता, सदर महिला हॉटेलमधून बाहेर पडून घरी निघाल्यानंतर त्या तरुणाने तिचा पाठलाग केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घाबरलेल्या महिलेने तात्काळ आपल्या पतीला फोनद्वारे संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

त्यानंतर महिलेचा पती मित्रांसह घटनास्थळी पोहोचला असता, संबंधित तरुण महिलेचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

महिलेच्या पतीने व मित्रांनी तरुणाला जाब विचारून समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करत अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने संबंधित तरुणाला पकडून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलीस ठाण्यातही संबंधित तरुणाने आपल्या कृत्याबाबत पश्चात्ताप न दाखवता, उलट पीडित महिला व तिच्या पतीला धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच पोलिसांच्या सूचनांनाही त्याने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पंकज रामदास नरसाळे (मूळ रा. गोरेगाव, ता. पारनेर; हल्ली रा. श्रीगोंदा) याच्याविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.

स्रोत : फिर्याद

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here