:
नाशिक
Mission Sapt Sagar divya mahajan nashik मूळची नाशिक (महाराष्ट्र) येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय दिव्या महाजन हिने जागतिक जलतरण क्षेत्रात भारताचा तिरंगा पुन्हा एकदा अत्यंत अभिमानाने फडकवला आहे. ‘मिशन सप्त सागर’ (Mission Sapt Sagar) या मोहिमेअंतर्गत दिव्याने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी इंग्लंड ते फ्रान्सदरम्यानची अत्यंत खडतर समजली जाणारी ‘इंग्लिश चॅनेल’ (English Channel) १४ तास आणि ३५ मिनिटांत यशस्वीरीत्या पोहून पार केली.
विशेष म्हणजे, अवघ्या एका महिन्यापूर्वी (२३ ऑगस्ट २०२६ रोजी) दिव्याने उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलंडदरम्यानची भयानक ‘नॉर्थ चॅनेल’ पार करून जगातील सर्वात तरुण महिला (Youngest Female in the World) ठरण्याचा जागतिक विक्रम रचला होता. या ऐतिहासिक विक्रमानंतर अवघ्या महिनाभरात तिने ही दुसरी आव्हानात्मक कामगिरी फत्ते केली आहे.
अतिशय प्रतिकूल वातावरणात ५० किमीचा प्रवास :
दिव्याने ३ ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे २:५० वाजता अथांग अंधारात पोहण्यास सुरुवात केली. प्रवासादरम्यान तीव्र लाटा, सोसाट्याचा वारा आणि समुद्रातील प्रतिकूल प्रवाहाचा सामना तिला करावा लागला. समुद्राच्या महाकाय प्रवाहाने मार्ग भरकटल्यामुळे तिला मूळ अंतरापेक्षा (33.7 km) जास्त, म्हणजेच तब्बल ५० किलोमीटरचे अंतर पोहावे लागले. मात्र, तिच्या अढळ विश्वासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर तिने फ्रान्सची किनारपट्टी गाठत दुपारी ५:२५ वाजता (फ्रान्स वेळेनुसार) यशस्वीरीत्या पाऊल ठेवले आणि भारतीय तिरंगा फडकवला.
या मोहिमेत ‘सी लेपर्ड’ (Sea Leopard) बोटीचे कॅप्टन स्टुअर्ट (Pilot Stuart) आणि सह-चालक शॉन (Shaun) यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली, तर ‘चॅनेल स्विमिंग असोसिएशन’च्या (Channel Swimming Association) वतीने जॉने मिल (Jon Mill) यांनी अधिकृत निरीक्षक (Observer) म्हणून काम पाहिले.
इंग्लंडमध्ये प्रशिक्षण आणि शिक्षणाची सांगड
ओपन वॉटर स्विमिंगच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सोय व्हावी यासाठी दिव्या सध्या आपल्या कुटुंबासह युके (UK) मध्ये वास्तव्यास आहे. तिने नुकतेच ‘GCSE’ परीक्षेत ८ आणि ९ ग्रेड्स मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले असून, सध्या ती प्रेस्टन येथील ‘कार्डिनल न्यूमन कॉलेज’ (Cardinal Newman College, Preston) येथे ‘A-Levels’चे शिक्षण घेत आहे. शिक्षण आणि खडतर सराव यांची उत्तम सांगड घालत तिने हे यश मिळवले आहे.
‘महाजन बंधू फाउंडेशन’ आणि मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश
हे संपूर्ण अभियान ‘महाजन बंधू फाउंडेशन’ (Mahajan Bandhu Foundation) या चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत राबवले जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मुलींचे क्रीडा व शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे हा आहे.
यासोबतच ‘बीबीसी चिल्ड्रेन इन नीड’ (BBC Children in Need) या सामाजिक संस्थेसाठी याद्वारे निधी संकलनही केले जात आहे.
तिरंग्याचा अभिमान आणि पालकांना आवाहन
अंतरराष्ट्रीय मंचावर ‘एंड्युरन्स चॅनेल स्विमिंग’ (Endurance Channel Swimming) या क्षेत्रात भारताची मान उंच उंचावण्याचे दिव्याचे स्वप्न आहे. आपल्या या यशाबद्दल बोलताना दिव्या म्हणाली, “प्रत्येक खाडी पूर्ण करून अंतिम रेषेवर भारताचा तिरंगा फडकवताना मला अत्यंत सार्थ अभिमान वाटतो. भारतात अजूनही अनेक मुलींना कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर तो विश्वास, पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत नाही, ज्यामुळे त्या मोठी स्वप्ने पाहण्यापासून वंचित राहतात. मला भारतातील प्रत्येक मुलीला सांगायचे आहे की स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने उभे राहा. जर मी हे करू शकते, तर भारतातील कोणतीही मुलगी काहीही साध्य करू शकते!”
दिव्याने जगभरातील सर्व पालकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
आपल्या या यशाबद्दल बोलताना दिव्याने तिचे प्रशिक्षक श्रीकांत विश्वनाथन, मार्गदर्शक तन्वी देवरे, आई अंजना महाजन, वडील डॉ. हितेंद्र महाजन, भाऊ ओम, काका डॉ. महेंद्र महाजन, कार्डिनल न्यूमन कॉलेजमधील शिक्षक व मित्रपरिवार, तसेच सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
‘मिशन सप्त सागर’ अभियानांतर्गत ७ पैकी ३ खाड्या पार झाल्या असून, अजून ४ समुद्रांवर भारताचा तिरंगा फडकवणे बाकी आहे!
“प्रत्येक खाडीच्या शेवटी भारताचा तिरंगा फडकवताना सार्थ अभिमान वाटतो; जर मी करू शकते, तर भारतातील प्रत्येक मुलगी अशक्य गोष्ट साध्य करू शकते” — दिव्या महाजन.
