अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
Ahilyanagar sabdhgandh sahitya शब्दगंध साहित्यिक परिषदेची चळवळ ग्रामीण भागापर्यंत झपाट्याने पोहोचली असून कथाकथन, काव्यसंमेलन, पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलन आदी विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबवून शब्दगंधने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शब्दगंधने साहित्य संमेलनांच्या विचारपीठावरून सातत्याने भूमिका मांडली.
आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, भविष्यात मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी शब्दगंधची चळवळ निश्चितच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,कृषितज्ज्ञ बापूसाहेब भोसले यांनी केले.
अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने शर्मिला गोसावी संपादित ‘मागे वळून पाहताना’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच जाधव लॉन्स येथे बापूसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुरेश चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मेधाताई काळे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, सुभाष सोनवणे, रेखाचित्रकार सतीश कुलकर्णी, मसाप चे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापूसाहेब भोसले म्हणाले, “शालेय जीवनापासूनच साहित्यिक, कलावंत आणि लेखकांशी माझा संबंध आला. बागायतदार म्हणून काम करत असतानाही गोरगरीब व कष्टकरी समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न केला. या कार्यात कधी फायदा झाला, तर कधी तोटाही सहन करावा लागला; मात्र त्याचा विचार कधी केला नाही. शब्दगंध च्या स्थापनेपासून आम्ही या चळवळीबरोबर आहोत आणि यापुढेही शेवटपर्यंत हे नाते कायम राहील.”
प्रा.मेधाताई काळे म्हणाल्या की, शब्दगंधचे विचारपीठ नवोदित साहित्यिकांना संधी देत असून त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिकांचाही योग्य सन्मान राखत आहे. ‘मागे वळून पाहताना’ हा लेखसंग्रह नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
लेखसंग्रहाच्या संपादक शर्मिला गोसावी यांनी प्रास्ताविकातून संग्रहामागील भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना, अनुभव आणि व्यक्तींचा प्रभाव असतो. हे अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असली तरी अनेकदा ते मनातच राहून जातात. ‘मागे वळून पाहताना’ या लेखसंग्रहाच्या माध्यमातून लेखकांना आपल्या आयुष्यातील चढ-उतार, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, साहित्यिक प्रवास आणि जीवनानुभव शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली आहे. नव्या-जुन्या सर्व साहित्यिकांचा शब्दगंधला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष सोनवणे, संतोष कानडे, ज्ञानदेव पांडुळे, विठ्ठल सोनवणे आणि स्नेहा पंजाबी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जालिंदर बोरुडे, स्वाती अहिरे, क्रांती करंजगीकर, वॉरियर्स फाउंडेशनच्या सचिव संगीता गिरी यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अनिल गर्जे यांनी केले, तर प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबनराव गिरी, मकरंद घोडके,शामा मंडलिक, संदीप गोसावी,हर्षली गिरी, दिशा व अनुष्का गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘मागे वळून पाहताना’ या लेखसंग्रहामध्ये प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे,सौ.जयश्री देशमुख, विठ्ठल सोनवणे, अजयकुमार पवार, स्वाती गोसावी, सौ.उर्मिला शिंदे, रामदास कोतकर, सौ.एस. एम. मिर्झा, सुरेखा घोलप, श्रीमती वर्षा भोईटे, सौ उज्वला धस, डॉ.अशोक ढगे, जगन्नाथ गोसावी यांच्यासह एकूण २४ व्यक्तींच्या जीवनानुभवांवर आधारित लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
जीवनातील संघर्ष, अनुभव, प्रेरणादायी व्यक्ती आणि साहित्यिक वाटचालीचे विविध पैलू या संग्रहातून वाचकांसमोर आले आहेत.
यावेळी सुरेखा कानडे, सौ एम आर जाधव, अविनाश देशमुख, कल्पना तुपे, उमादेवी राऊत,सौ.फरहिम शेख,सोमनाथ लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
