मुंबई दि. २७प्रतिनिधी
होलिकोत्सव हा रंगांची उधळण करण्याचा, कुटुंब, नातेवाईक व मित्र परिवारातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा उत्सव असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे; त्यामुळे होळी व धुलिवंदन नेहमीच्या उत्साहात साजरे करता येणार नसल्याचे शल्य नक्कीच आहे, मात्र यावर्षी आपली व कुटुंबाची सुरक्षा दृष्टीक्षेपात ठेऊन होळी व धुलिवंदनाचा आनंद आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या घरच्या घरीच द्विगुणित करा, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना केले आहे.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस आदींचे दहन होऊन इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी, शांती व आरोग्य नांदावे, धुळवडीच्या रंगांमध्ये कोरोनाचे सावट धुवून निघावे अशा शब्दात ना. मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
२६ मार्च ते ०४ एप्रिल दरम्यान बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील वर्षी होळीच्या दिवसापर्यंत राज्यात व बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, मात्र आज हजारो नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे होळी व धुळवड नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी होणार नाही, याचे शल्य मनात असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागत आहेत, त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखत शासकीय नियमांचे पालन करावे व कोरोना संसर्गाच्या फैलावास रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
नगर पंचायत चे प्रभाग आरक्षण जाहीर
[…] […]