ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित

पुणे : प्रतिनिधी

Ramdas Athawale on operation tiger ऑपरेशन टायगर हे भारतीय जनता पक्ष अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडवून आलेले नाही; तर ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते असून त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांना आपलेच लोक सांभाळता आले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे. ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असेही आठवले यांनी नमूद केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर,  प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिपाल वाघमारे, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप, ॲड. मंदार जोशी, शाम सदाफुले, विरेन साठे, बसवराज गायकवाड, अण्णा वायदंडे, शशिकला वाघमारे, संघमित्रा गायकवाड, जयदेव रंधवे, क्रिस्टोपर राजमनी, थॉमस मॅडम, रेश्मा शेख, मिलाज मेमन, अरविंद शिंदे, बाबा साळवे, उमेश कांबळे, सचिन गवळी आदी उपस्थित होते.

Ramdas Athawale on operation tiger रामदास आठवले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि आदरणीय नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन आपण यापूर्वीच केले होते. ते त्यांनी मान्य केले असते तर ते कदाचित देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, असा दावाही आठवले यांनी केला. तसेच आपण पवार यांच्याबरोबर होतो तेव्हा त्यांना काँग्रेस मध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. तो त्यांनी मानला असता तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान झाले असते, असा दावाही आठवले यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे विलीनीकरण झाले असते तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाध्यक्ष झाले असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता मावळली असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. अर्थात शरद पवार यांचा पक्ष अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. त्यातच समाजाचे आणि देशाचे हित आहे, असेही आठवले म्हणाले.

एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध आहे. तरीदेखील ते भारतीय जनता पक्षात येऊ इच्छित असतील तर भाजपने त्याबाबत सकारात्मक विचार करावा, असा सल्लाही आठवले यांनी दिला.

अयोध्येच राम मंदिरात झालेला गैरव्यवहार ही अत्यंत गंभीर गोष्ट असून दोषींना कठोर शासन करण्यासाठी मंदिर प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि संबंधित नेते सक्षम असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल केलेल्या विवादास्पद विधानावरही आठवले यांनी भाष्य केले. ॲट्रॉसिटी कायदा हा वंचित समाजाला न्याय देण्यासाठी अस्तित्वात आला असून इतरांवर अन्याय करणे हे त्याचे उद्दिष्ट नाही. त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि त्यामुळे इतरांवर अन्याय होऊ नये ही आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यानी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये मंत्री करावे म्हणजे अर्थातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही, या आमदार बच्चू कडू यांच्या विधानावर आठवले यांनी टीका केली. सन 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी राहतील आणि भाजप शिंदे यांना यापुढे मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

मातृभाषेचा अभिमान बाळगणे अत्यावश्यकच आहे. मात्र त्या अभिमानातून अन्य भाषांचा द्वेष करणे हा संविधानाचा अपमान आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी भाषेत केलेल्या भाषणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगाने ते बोलत होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये 60 टक्के मराठी लोक राहतात तर 40 टक्के अन्य भाषिक लोक राहतात. त्यामुळे देशभरात बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेत भाषण करणे अजिबात गैर नाही, असेही आठवले म्हणाले. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी भाषेबाबत व्यापक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे ही बाब स्पष्ट आहे. मातंग समाजात देखील शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, असे आपल्या पक्षाचे मत असल्याचा पुनरुचार आठवले यांनी केला. समाजातील प्रत्येक वंचित घटकाला घटनेने दिलेले लाभ मिळाले पाहिजे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles