ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील “समर्थ क्रॉप केअर” कंपनी व तिच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित आरोपींविरुद्ध फसवणूक व आर्थिक गुन्ह्यांतर्गत तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन संतोष उर्फ बालुदादा मखरे, सुनील वाळके, श्रीमती चेतना किरण मांगडे व हेमंत लोखंडे यांच्या वतीने सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “समर्थ क्रॉप केअर” कंपनी व तिच्या संचालकांनी शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून आर्थिक व्यवहार केले असून, त्यामधून मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात भारतीय दंड संहिता / बीएनएस अंतर्गत फसवणूक व आर्थिक गुन्ह्याचे गंभीर कलम लावणे आवश्यक आहे.
तसेच,
▪️ कंपनीच्या सर्व संचालकांची बँक खाती, स्थावर-जंगम मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.
▪️ आरोपींचे सीडीआर (Call Detail Records) व एचडीआर (Human Detail Records) तपासून या आर्थिक घोटाळ्यामागील इतर व्यक्तींचाही सहभाग उघड करण्यात यावा.
▪️ संबंधित आरोपींच्या पासपोर्टवर तात्काळ निर्बंध घालून देशाबाहेर पलायन रोखावे.
▪️ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आरोपी फरार होण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ लूकआऊट नोटीस (LOC) जारी करण्यात यावी.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होत असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली आहे.

