ऋषिकेश भास्कर सांगळे
( शहर प्रतिनिधी )
श्रीगोंदा | दि. ५ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात वाढलेल्या टवाळखोरीच्या घटनांवर पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी या गंभीर विषयाकडे माध्यमांतून लक्ष वेधल्यानंतर श्रीगोंदा पोलीस व वाहतूक शाखा ‘ऍक्टिव्ह मोड’वर येत हुल्लडबाज तरुणांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात आली.
शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत परिसरात विनाकारण थांबणारे, कर्णकर्कश आवाज करणारे तसेच सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या दुचाकीधारकांची कसून तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या कारवाईमुळे विशेषतः महाविद्यालयीन तरुणी व पालकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत होत आहे. श्रीगोंदा पोलीस वेळोवेळी प्रभावी कारवाई करतात, याबाबत नागरिकांमध्ये कोणतीही शंका नाही. मात्र, अशा कारवाया सातत्याने आणि नियमित स्वरूपात सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
शहरात छेडछाड, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणारे प्रकार घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्यास अशा घटनांना आळा बसेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केवळ एखाद्या घटनेनंतर नव्हे, तर नेहमीच गस्त, तपासणी आणि नियमभंगावर तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
यासोबतच, अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी किंवा चारचाकी देताना पालकांनीही अधिक जबाबदारीने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शाळा व महाविद्यालय परिसरात मोठ्या आवाजात हॉर्न, वेगाने वाहन चालवणे व गोंधळ घालणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी पालक, समाज आणि प्रशासन यांचा संयुक्त सहभाग आवश्यक असल्याचेही नागरिकांचे मत आहे.
पोलिसांची सध्याची कारवाई निश्चितच स्वागतार्ह असून, ती कायमस्वरूपी आणि सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करत श्रीगोंद्यातील नागरिकांनी सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस धाक निर्माण करावा, अशी मागणी केली आहे.

