भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ;आर्वी बेट पाण्याखाली

अहिल्यानगर,

shrigonda arvi bet water पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने तातडीचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी वाढत आहे. आज (दि. ०६ जुलै) सकाळी १० वाजता भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २४,०४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून आगामी कालावधीत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दादासाहेब गिते यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठावरील गावे, वस्त्या आणि संवेदनशील भागातील नागरिकांना तातडीने सतर्क करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक कर्मचारी सतत कार्यरत ठेवावेत. संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये अन्नधान्य व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. तसेच गर्भवती महिला, आजारी व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती यांचे संभाव्य पूरस्थितीचा विचार करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नागरिकांनी नदीपात्र व नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखावे. नदीकाठावर वास्तव्यास असल्यास आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. तसेच पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धोकादायक पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आवश्यक उपाययोजना करून दक्ष राहावे, तसेच अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. गिते यांनी दिल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीस दौंड पूल येथे सायंकाळी 6.00 वाजता 52,137 क्युसेक विसर्गामुळे श्रीगोंदा तालुक्‍यातील भिमा नदीपात्रातील आर्वी बेट (क्षेत्र सुमारे 400 एकर) कडे जाणारा बंधाऱ्याचा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. सदर बेटावर 185 लोकसंख्‍या वास्‍तव्‍यास आहे. सदर बेटावरील नागरीकांना आपत्‍कालीन परिस्थितीच्‍या अनुषंगाने एक रबर बोट उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles