Home ताज्या बातम्या सीना नदीतून तातडीने पाणी सोडा-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

सीना नदीतून तातडीने पाणी सोडा-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

0
24

अहिल्यानगर,

Seena river water discharge शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या पाण्याच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन सीना प्रकल्पातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.

पारनेर तालुक्यातील टंचाई आढावा बैठकीदरम्यान तसेच विविध गावांच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी केलेली मागणी तत्काळ मान्य करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिले.

पारनेर तालुक्यात टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी पाणी उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतीपिके व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार सीना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन क्रमांक २ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेती तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने वापर करावा. पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.


NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here