शिरूर कासार
राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पालखी म्हणून ओळखली जाते.या दिंडी पालखीला सेवा देण्याचे काम शिरूर येथील मुस्लिम बांधव करत आहेत. या दिंडीत आलेल्या वारकऱ्यांचा फराळ सेवा मुस्लिम बांधवांनी प्रदान केली. यामधे आलेल्या वारकऱ्यांना केळी, साबुदाणा, आणि चहा देत आपला दिंडीतील सहभाग नोंदवला.
शिरूर येथील समीर अमीर बागवान हे गेल्या तीन वर्षापासून संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीला फराळ देण्याचे काम करतात . त्यांच्याबरोबर शिरूर येथील मुस्लीम समाज असतो . पूर्वी ते सर्व साहित्य दिंडीला पुरवत असे . मात्र त्यानंतर त्यांनी रस्त्यात मंडप उभारून येणाऱ्या वारकर्यांना फराळ साहित्य वाटप करणे सुरु केले.आता त्यांचे तिसरे वर्ष आहे . दिंडीत हिंदुमुस्लीम ऐक्याची भावना यातून वाढीस लागत आहे.
पैठणहून निघालेली पालखी दिंडी आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे पोहचली. या पालखी मार्गावर वारकऱ्यांची मांदियाळी दिसत होती.
१२० किलो चांदीच्या रथातून ही दिंडी येथे पोहचली. वारकऱ्यांमध्ये वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांचा जथ्था आपल्या टाळ मृदुंगासह आणि हरिनामाचा जयघोष करत चालत आहेत.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करत वारकरी आपल्या लवाजम्यासह पुढे पुढे जात आहे.
पालखी सोहळ्याचे हे सलग ४२६ वे वर्ष असून रघुनाथबुवा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूर कडे जात आहे.
आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी, म्हणजेच ५ जुलै रोजी ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होईल. यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीचा प्रवास चांदीच्या भव्य रथातून होतो आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या १२० किलो चांदीतून बनवलेल्या या रथाच्या निर्मितीसाठी लागलेली मजुरी व साहित्याचा खर्च दीड कोटी रुपयांवर गेला आहे.

