आष्टी : प्रतिनिधी
national highway आष्टी-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी ते कडा, साबलखेड या अंतराचा रस्त्याची मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे पूर्णपणे दुरवस्था झाली आहे.
यासाठी कडा येथील ग्रामस्थांनी वारंवार दुरुस्तीसाठी विनंत्या करूनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली कडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळित झाली होती.
आष्टी-नगर राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे national highway हस्तांतरीत झाला असून नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चिंचपूर ते आष्टी व साबलखेड ते नगर या अंतरावरील रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
मात्र, आष्टी शहरापासून पुढे साबलखेडपर्यंत या सतरा किमी रस्ता निधीअभावी काम केले नाही असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूने रस्ता तयार केला जातो मात्र मधेच सतरा किमी रस्ता निधीअभावी रखडतो याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत असून छोटे-मोठे अपघात दररोज घडत आहेत. अपघातात दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नगर या कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप तारडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून तसेच पाठपुरावा करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्याने कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी परिसरातील ग्रामस्थांसह सोमवारी कडा येथील आंबेडकर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले.
या वेळी रमजान तांबोळी, संजय ढोबळे, संपत सांगळे, बाळासाहेब कर्डिले, संदीप खाकाळ,अण्णासाहेब नाथ, युवराज पाटील, किशोर घोडके, दीपक गरूड, बबलू आखाडे, सचिन पोकळे, दत्ता ढोबळे, उपसरपंच संपत कर्डिले,संतोष ओव्हाळ, सुभाष ढोबळे,परमेश्वर कर्डीले,सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल एक चाललेल्या या रास्ता रोकोमुळे नगर-बीड रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
आणखी वाचा : गणपती उत्सव विशेष :आगळे वेगळे गणेश
तलाठी नवनाथ औंदकर व सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले.
नगर येथील अभियंता दिलीप तारडे यांनी आष्टी ते धानोरा या रस्त्याचा डांबरीकरण कामाचा समावेश वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये करण्यात आला असून मंजुरी प्राप्त होताच कामास सुरवात करण्यात येईल. तसेच तसेच सद्यःस्थितीत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन दिवसांत हाती घेण्याच्या आश्वासनाचे पत्र तलाठी नवनाथ औंदकर यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांना दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
national highway ला मुरुमाची मलमपट्टी
national highway आष्टी ते साबलखेड या मार्गावर हजारो खड्डे पडले आहेत त्यामुळे सोमवारी कड्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर सोमवारी दुपारनंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून मलमपट्टी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे मात्र हा टाकलेला मुरूम किती दिवस त्या खड्ड्यांमध्ये राहील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सदरील खड्डे डांबराने बुजवने गरजेचे असताना मुरुमाची मलमपट्टी कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.