छत्रपती संभाजीनगर, दि. २६ :-
marathwada dushkal 2026 खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट आणि अन्य घटकांमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांतील ७४ तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाली असून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण २६५ तालुक्यांचा यात समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुके यात असून छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट यांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव यांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत यांचा समावेश आहे.
marathwada dushkal 2026 विविध सवलती व उपाययोजना लागू
शासन निर्णयानुसार या दुष्काळग्रस्त भागांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा सवलती लागू करण्यात आल्या आहेत. ७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून त्यावरील क्षमतेच्या पंपांना सदर सूट लागू राहणार आहे.
तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता करणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश
Trigger-1 लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तात्काळ सादर करावयाचा आहे.
दरम्यान, संबंधित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
