किसान सभा काढणार नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च

- Advertisement -
- Advertisement -

 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ

 किसान सभा काढणार २० हजार शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च

नाशिक, २२ जानेवारी २०२१

केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च आयोजित करण्यात येत आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी, दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी शेकडो वाहने घेऊन सुमारे 20 हजार शेतकरी या वाहन मार्चमध्ये सहभागी होत आहेत.

अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. ही युवक संघटना व एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मार्चमध्ये सामील होणार आहेत.

नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबेल. 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घाटनदेवी येथून निघून 20 हजार शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च 24 जानेवारी रोजी दुपारी सामील होईल.

राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.

दिनांक 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल.

हेही वाचा:बीड जिल्ह्यात 38 कोरोना बाधित 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles