जालना
Jalna news soyabin ghotala घोटाळ्यांची मालिका थांबता थांबेना.जालन्यात आता हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे तयार करून शासनाची सुमारे 1 कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भोकरदनच्या पारध पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालन्यात फसवणुकीची, अपहाराच्या घटनांचे सत्र थांबता थांबेना.जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात हमीभावात सोयाबीन विकण्याकरता बनावट सातबारा उतारे,खोटे पिकपेरे जोडून शासनाची सुमारे 1 कोटी 2 लाख 38 हजार रुपयांत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष,सचिव आणि संचालक मंडळातील काही मंडळी अशा 10 जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंस्थेने 2024 – 25 मध्ये 39 हजार 379 क्विंटल सोयाबीन खरेदी केल्याचे दाखवले असून, त्यापैकी 2 हजार 93 क्विंटल जास्तीच्या सोयाबीन पीकपेऱ्याची नोंद करुन हा अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने संबंधितांच्या विरोधात पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या मुंबई येथील मुख्यालयात तक्रारदार संग्रामसिंह राजपूत (लिहा, ता. भोकरदन) यांनी या बाबत
तक्रार दाखल केली होती.त्यांच्या तक्रारीची दाखल घेत झालेल्या प्राथमिक चौकशीत हा घोटाळा उघड झाला आहे.संस्थेने सोयाबीन खरेदी करताना शासनाची दिशाभूल करणे,संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालकांवर खोटे दस्तऐवज सादर करणे, क्षमतेपेक्षा जास्त सोयाबीन खरेदी,या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अधिक तपास पारध पोलीस करीत आहेत.

