राज्यव्यापी कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा शुभारंभ
बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन्सवरील फिरत्या प्रदर्शनांच्या मदतीने जनजागृती करण्याचा रिजनल आऊटरिच ब्युरोचा उपक्रम
पुणे, 7 फेब्रुवारी,प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेचा शुभारंभ आज पुण्यात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालाा.
या उपक्रमाअंतर्गत 16 व्हॅन्स द्वारे फिरती बहुमाध्यमी प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून, या मोबाईल व्हॅन्स महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत फिरणार आहेत. या अभियानाची तयारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुण्यातील रिजनल आऊटरीच ब्युरोतर्फे करण्यात आली आहे व या कामी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे
संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना 130 कोटी लोकसंख्या असूनही भारताने लॅटिन अमेरिका, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत या रोगावर नियंत्रण मिळवण्यात जास्त यश मिळवलेले आहे.
लसीकरणाची सुरुवात झाल्यानंतर आपण संवादाच्या एका नवीन टप्प्यावर पोहोचलो आहोत असे यावेळी मंत्री म्हणाले.
आघाडीच्या 50 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे त्यानंतर 50 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची लसीकरण होईल व त्यानंतर सर्व जनतेचे लसीकरण करण्यात येईल.
जावडेकर पुढे म्हणाले की, या व्हॅन्स प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करून रस्त्यावरच्या गावागावांमध्ये कोरोना विषयक संदेशाचा आणि लसीकरणाचा प्रसार करतील.
या प्रदर्शनातून लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी लोककलाकार उपक्रमांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करतील आणि मनोरंजनाच्या माध्यमातून स्थानिक कलांद्वारे हे उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवले जातील.
गीत व नाटक विभागाचे कलाकार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील स्थानिक कलांच्या माध्यमातून हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतील.
लसीकरण योजनेची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविडविषयक नियमांबाबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात योग्य शब्दांत माहिती पोचवणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणे, हादेखील प्रदर्शनाचा उद्देश आहे.
कोविड-19 चे संक्रमण आटोक्यात आणण्यात जनसंवादाची महत्वाची भूमिका राहिली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, या मोहिमेअंतर्गत, सरकारी यंत्रणा, लोकांच्या दारोदारी जाऊन प्रचार आणि जनजागृती करेल.
माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांचे प्रमुख जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा:नाथऱ्याच्या गावकर्यांनी कसा केला भूमिपुत्र धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार
[…] […]