Ahmednagar news : जिल्ह्याला तीन पुरस्कार

Ahmednagar news
Ahmednagar news

अहमदनगर

Ahmednagar news शासनाच्या 2021-22 या वर्षाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या अभियानात अहमदनगर जिल्ह्याने तीन पुरस्कार मिळवत अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

in article

अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (शासकीय अधिकारी गट) व राहाता पंचायत समिती यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो.ना.बागुल यांच्या स्वाक्षरीने याबाबतच्या शासननिर्णय 18 एप्रिल 2022 रोजी प्रसिध्द झाला आहे.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते.

या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला आहे.

रोख 10 लाख रूपये,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यापासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत दैंनदिन टपालाचे वितरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने विकसित केलेल्या ‘ई-टपाल प्रणाली’ या उपक्रमास हा पुरस्कार देण्यात आला.

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत विभागीय स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीला मिळाला आहे. रोख 4 लाख रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली राहाता पंचायत समितीने नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्यांचे थेट निराकरण करणे, कोरोना कालावधीत मदत, बचत गट विक्री व प्रदर्शन कार्यक्रम, घरकुल प्रकल्प सक्षमपणे राबविणे या कामासाठी हा पुरस्कार राहाता पंचायत समितीला देण्यात आला आहे.

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत शासकीय अधिकारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना मिळाला आहे. रोख 50 हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शेतकरी व नागरिकांचे दैंनदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याकरिता जिल्ह्यात ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ राबविण्यात आले.या उपक्रमांसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व राहाता पंचायत समिती गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here