Homeताज्या बातम्याशेताच्या बांधावर पोहोचले केंद्रीय पथक; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून दुष्काळाच्या झळांची घेतली प्रत्यक्ष...

शेताच्या बांधावर पोहोचले केंद्रीय पथक; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून दुष्काळाच्या झळांची घेतली प्रत्यक्ष अनुभूती

अहिल्यानगर, दि. 9

ahilyanagar centre Drought assessment team दुष्काळाची तीव्रता केवळ आकडेवारीतून समजत नाही, तर शेताच्या बांधावर उभे राहून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतरच त्याची खरी दाहकता जाणवते. पावसाअभावी करपलेली पिके, पाण्याअभावी कोरडे पडलेले तलाव आणि दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत आलेले शेतीपूरक व्यवसाय… या परिस्थितीचे प्रत्यक्ष चित्र शुक्रवारी केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन पथकाने अनुभवले.

पथकातील अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्याबरोबरच पाणी, चारा आणि आर्थिक मदतीबाबत त्यांच्या अपेक्षाही समजून घेतल्या.


खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाचे आंतरमंत्रालयीन पथक शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकप्रमुख के. पोन्नुसामी (संचालक, केंद्रीय पीक विभाग) यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या सह चास, निमगाव वाघा, कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात, वालवड आणि रेहेकुरी या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.

करपलेल्या पिकांतून दुष्काळाची दाहकता स्पष्ट

पथकाने चास येथे बाजरी, तूर आणि कांदा या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. विठ्ठल गवळी, पोपट गवळी, भिकाजी सहादू देवकर, अनिल देवकर आणि श्रीपती देवकर या शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची स्थिती आणि शेतीतील अडचणी जाणून घेतल्या. पावसाच्या कमतरतेमुळे पिकांवर झालेला परिणाम आणि अपेक्षित उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक अडचणींची माहिती यावेळी देण्यात आली.
निमगाव वाघा शिवारातील कोरड्या पडलेल्या पाझर तलावाची पाहणी करत पथकाने पाणी उपलब्धतेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाअभावी जलस्रोतांवर झालेला परिणाम आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ahilyanagar centre Drought assessment team शेतकऱ्यांशी थेट संवाद; पीक नुकसानीची घेतली माहिती

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे पथकाने दुष्काळामुळे बाधित झालेल्या बाजरी आणि तूर पिकांची पाहणी केली. यावेळी पांडुरंग चांडे, सागर ढोबळे, बाळासाहेब सपकाळ, नंदलाल, किरण पाटील आणि आबा काळदाते यांच्याशी संवाद साधण्यात आला. पेरणीसाठी केलेला खर्च, पिकांपासून अपेक्षित असलेले उत्पन्न आणि प्रत्यक्ष झालेली हानी याबाबत पथकातील अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

चिंचोली काळदात येथे कोरड्या तलावाची पाहणी करताना दादा ढोबे, सरपंच सुधीर फडतरे, राजेंद्र काळदाते, बापूसाहेब काळदाते आणि दत्तात्रय काळदाते यांच्याशी पथकाने संवाद साधला. दुष्काळाच्या झळांमुळे बाधित झालेल्या सीताफळ बागेचीही पाहणी करण्यात आली. पाण्याअभावी बागेचे नुकसान झाल्याने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची माहिती घेण्यात आली. दुष्काळाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित न राहता शेतीपूरक व्यवसायांवरही होत असल्याचे यावेळी समोर आले. दुष्काळी परिस्थितीमुळे पोल्ट्री फार्म बंद पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी पथकाला दिली. तसेच प्रमिला मनोहर लाळगे यांच्या तूर पिकाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

पाणी, चारा आणि मदतीसाठी शेतकऱ्यांची आर्त मागणी

वालवड येथे पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीची पाहणी करून पथकाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर रेहेकुरी शिवारात नारायण सिताराम वाघमोडे यांच्या मका पिकाची शेतात उतरून पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी किती खर्च झाला, पिके चांगली आली असती तर किती उत्पन्न मिळाले असते, जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे का, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, दुष्काळामुळे दूध उत्पादनावर काय परिणाम झाला आणि पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहेत का, असे प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या माध्यमातून शेतीचे नुकसान, आर्थिक फटका आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या दैनंदिन अडचणींची माहिती घेण्यात आली.

‘चारा-पाण्याची स्थिती गंभीर आहे. गावाची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढवावा आणि शासनाकडून मदतीच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी शेतकऱ्यांनी पथकाकडे केली. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतीचे नुकसान सहन करताना जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणेही आव्हानात्मक बनल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा

क्षेत्रीय पाहणीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि दुष्काळाशी संबंधित परिस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली.

या दौऱ्यात कृषी आयुक्त सूरज मांढरे, प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील, कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील, नगर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे, कर्जत तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सतवण आदी अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करणे, प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणे आणि पाणी व चाऱ्याच्या प्रश्नांबाबत माहिती घेणे, या माध्यमातून केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती समजून घेतली. या पाहणीदरम्यान संकलित केलेल्या माहितीच्या आधारे पथक केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून समोर आलेल्या समस्या आणि जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments