राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या देशमुख यांचे श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत;
ढोलताशांच्या गजरात फटक्यांची आतिषबाजी
श्रीरामपूर ( गौरव डेंगळे)
rashtrakul spardha चंद्ररूप जैन कॉलेज ऑफ कॉमर्सचे शारीरिक संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी ऑकलंड (न्यूझीलंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग मास्टर्स क्रीडा स्पर्धेत ९३ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून श्रीरामपूर शहराचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.
आज श्रीरामपूर येथे परतल्या नंतर त्यांची शहरातील आझाद मैदानापासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
राष्ट्रकुल पावर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने ऑकलँड न्यूझीलंड येथे राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धा दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान पार पडली. वयाच्या ५७ व्या वर्षी प्रा.सुभाष देशमुख यांनि या राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धेत ९३ किलो वजन गटात देशासाठी सुवर्णपदक पटकावले.
या ९३ किलो वजन गटात इंग्लंड,कॅनडा,पाकिस्तान,श्रीलंका दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड,बांगलादेश,आयर्लंड,ऑस्ट्रेलिया या देशातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना प्रा.देशमुख यांनी सुवर्णपदकला गवसणी घातली.
या मिरवणुकी दरम्यान असंख्य खेळाडूंनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. देशमुख यांचे पुष्पहार घालून स्वागत करत अभिनंदन केले.
प्रा. देशमुख यांनी जागतिक पातळीवर श्रीरामपूर तालुक्याचे नाव उंचावल्याने शहरातील नागरिक आणि खेळाडूंच्या आनंदाला पारावार राहीला नव्हता.
ढोलताशांच्या गजरात तसेच फटाक्यांचच्या आतिषबाजीने संपूर्ण श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत असल्याचे भासले.देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे ही माझ्या वडिलांची इच्छा होती.
आज मी वयाच्या ५७ व्या वर्षी ती पूर्ण केली,असे प्रा.सुभाष देशमुख म्हणाले.