Homeताज्या बातम्याराज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाची स्थापना

राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाची स्थापना

मुंबई,

Central team to assess drought in maharahstra महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे मदतीसाठी अंतरिम अहवाल सादर केला असून, त्यामध्ये NDRF अंतर्गत मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

तसेच नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या रबी हंगामाच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांसमोरील संकटाची गंभीरता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

यावेळी राज्यातील दुष्काळाची भीषणता समजून घेण्यासाठी लवकरात लवकर पथक पाठवण्याची विनंती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली होती.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले होते.

महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, केंद्राचे पथक लवकरात लवकर महाराष्ट्रात येऊन दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे केंद्रीय कृषी मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवून पाठपुरावा करत होते.

राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे.

या पथकाचे अध्यक्ष कृषी व किसान कल्याण विभागाचे सहसचिव श्री. मुक्तानंद अग्रवाल असतील.

पथकामध्ये केंद्र शासनाच्या विविध महत्त्वाच्या १० विभागांचे प्रतिनिधी सहभागी असणार आहेत. यामध्ये वित्त विभाग, नीती आयोग, कृषी विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सार्वजनिक वितरण व अन्न विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, ग्रामविकास विभाग, जलशक्ती मंत्रालय, महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पीक विभागाचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हे पथक राज्य शासनाच्या समन्वयाने दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून, दुष्काळाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करून तातडीने केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे.

राज्य शासनाच्या २६ सप्टेंबर २०२६च्या शासन निर्णयानुसार २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सुमारे ८० टक्के भागावर दुष्काळाचे सावट असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

केंद्राचे पथक दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०२० नुसार दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना NDRF व SDRF अंतर्गत मदत, आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील पुनर्वसनासाठी आवश्यक शिफारशी केंद्र शासनाला सादर केल्या जाणार आहेत.

केंद्राचे पथक महाराष्ट्रात येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असून, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments