अहिल्यानगर, दि. 9 मार्च 2026 –
जामखेड फायरिंग प्रकरण: शहरात पैलवान सागर किसन मोहळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पैलवानावर जीवघेणा हल्ला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर रोड ते खाडेनगर जाणाऱ्या रस्त्यावर नुराणी कॉलनी परिसरात ही घटना घडली. मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी पैलवान सागर किसन मोहळकर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी किसन चांगदेव मोहळकर (रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1) तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमागे जुने वैमनस्य कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश देण्यात आले.
विशेष पथकाची कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे दोन विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील माहिती गोळा करून तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान हा हल्ला अभिमन्यु महादेव पोते (वय 24, रा. जामखेड) व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जिक्री (ता. जामखेड) येथील शिवारात सापळा रचून अभिमन्यु पोते याला ताब्यात घेतले.
चौकशीत धक्कादायक खुलासा
पोलीस चौकशीत आरोपीने कबुली दिली की, त्याने आपल्या इतर साथीदारांसह जुने वाद असल्यामुळे पैलवान सागर मोहळकर यांना ठार मारण्याचा कट रचला होता.
या कटात खालील आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे:
चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे) – फरार
रोहित विठ्ठल आखाडे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे) – फरार
चिन्या (पूर्ण नाव अज्ञात, रा. कोथरुड, पुणे) – फरार
4 मार्च रोजी अभिमन्यु पोते याने सागर मोहळकर यांच्या हालचालीची माहिती आपल्या साथीदारांना दिली. त्यानंतर त्यांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला, अशी कबुली आरोपीने दिली.
मुद्देमाल जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून पोलिसांनी पुढील मुद्देमाल जप्त केला आहे:
35 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र)
1 जिवंत काडतूस
40 हजार रुपये किमतीची विना नंबरची ज्युपिटर मोटारसायकल
15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन
एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पुढील तपास सुरू
अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली

