✍️ ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा –
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीतच घरफोडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, घरातील चालकानेच विश्वासघात करत मालकाच्या घरातील दागिन्यांवर हात साफ केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तात्काळ आणि जलद तपास करत चालकासह पाच जणांना अटक करून चोरीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मतदानाच्या दिवशी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत, फिर्यादी यांच्या घरी चालक म्हणून कार्यरत असलेल्या अभिषेक बाळासाहेब होले (रा. औटेवाडी, ता. श्रीगोंदा) याने घरातून सुमारे १३ ग्रॅम सोन्याचे व ६ भार चांदीचे दागिने लंपास केल्याची बाब समोर आली. या प्रकरणी ११ डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी अभिषेक होले याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, भाऊसाहेब पोपट तुपे, मनोज वसंत सकट, जिजाबा संजय ढवळे व विशाल बंडू खराडे (सर्व रा. औटेवाडी) यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक करून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस हवालदार आप्पा तरटे यांनी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
➡️ अटकेत असलेले आरोपी :-
अभिषेक बाळासाहेब होले
भाऊसाहेब पोपट तुपे
मनोज वसंत सकट
जिजाबा संजय ढवळे
विशाल बंडू खराडे
(सर्व रा. औटेवाडी, ता. श्रीगोंदा)
❓ चोरीचा माल स्वीकारणाऱ्याबाबत पुढे काय?
या गुन्ह्यात चोरीचे दागिने विक्री केल्याबाबत आरोपींनी पोलिस चौकशीत माहिती दिली असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित ठिकाणाहून दागिने हस्तगत केले आहेत. मात्र, चोरीचा माल स्वीकारणे व खरेदी करणे हा देखील कायद्याने गुन्हा ठरत असताना, या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
या संदर्भात पोलिस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित सराफ व्यावसायिकाची बाजू उपलब्ध होऊ शकली नाही.
🔎 कायदेशीरदृष्ट्या महत्वाची नोंद :-
ही बातमी पोलिस तपास व अधिकृत माहितीनुसार तयार करण्यात आलेली असून, पुढील कारवाई तपासाअंती निश्चित होणार आहे.

