दीड कोटीचा चांदीचा रथ घेऊन निघाली या संताची पालखी

राज्यातील मानाच्या तिसऱ्या पालखी यात्रेला यंदा अनोखं रूप लाभलं आहे. पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी १२० किलो चांदीच्या रथातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. भक्तांच्या लोकसहभागातून तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चांदीच्या रथामुळे वारकऱ्यांमध्ये वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे.

नाथांच्या पादुकांनी वाड्यातून मंदिराकडे प्रस्थान केलं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पादुका दर्शनासाठी मंदिरात ठेवल्या होत्या. त्यानंतर गोदावरीच्या तीरावरील ओट्यावर चांदीच्या रथात पादुका विराजमान करण्यात आल्या. टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतलं.

पालखी सोहळ्याचे हे सलग ४२६ वे वर्ष असून, आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी, म्हणजेच ५ जुलै रोजी ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होईल. यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीचा प्रवास चांदीच्या भव्य रथातून होतो आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या १२० किलो चांदीतून बनवलेल्या या रथाच्या निर्मितीसाठी लागलेली मजुरी व साहित्याचा खर्च दीड कोटी रुपयांवर गेला आहे.

पालखीवाले असा मान असलेल्या रघुनाथ गोसावी यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या वंशज आणि सध्याचे पालखीवाले ज्ञानेश बुवा गोसावी यांनी व्यक्त केला. “नाथ महाराजांचे भक्त पुढाकार घेऊन जे योगदान देतात, त्यातूनच हा ऐतिहासिक सोहळा अधिक वैभवशाली होत आहे,” असं ते म्हणाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चार रिंगण पार पडणार असून, सर्व पालख्यांचा एकत्र काला गोपाळपूर येथे होतो. मात्र संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला हा थेट विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात होतो — हा विशेष मान केवळ या पालखीला लाभतो.

पावसाच्या साक्षीने सुरू झालेला हा सोहळा भक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा नवा अध्याय लिहित आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेली संत एकनाथांची पालखी यंदा पंढरपूरकडे अधिक तेज आणि भक्तिभाव घेऊन निघाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles