मुंबई | दि. 8 नोव्हेंबर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांना आता 20 ऐवजी 40 प्रमुख प्रचारक (Star Campaigners) नियुक्त करण्यास परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ही मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पक्षांना प्रचार नियोजनात अधिक लवचिकता मिळणार आहे.
✦ पक्षांच्या मागणीनंतर आयोगाचा निर्णय
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून आयोगाने विद्यमान नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
✦ नियमांनुसार तरतूद
‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांबाबतच्या तरतुदी नमूद आहेत. या तरतुदींच्या आधारे आयोगाने संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
✦ यादी सादर करणे बंधनकारक
राजकीय पक्षांना त्यांच्या प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी सादर करावी लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

