पद्मभूषण डॉ. विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार ह.भ.प. श्रावण महाराज कुवरा यांना जाहीर

- Advertisement -
- Advertisement -

पद्मभूषण डॉ. विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार ह.भ.प. श्रावण महाराज कुवरा यांना जाहीर

लोणी,
Vikhe patil purskar वारकरी संप्रदाय आणि संत सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्यातील आलोंडे-कोकणपाडा येथील हभप श्रावण महाराज कुवरा यांना यावर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी बुधवारी पुरस्काराची घोषणा केली.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सन २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो. लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखालील भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील( ठाणे ) व प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे ( नेवासा ) हे त्रिसदसीय समिती ही निवड करते.

यापूर्वी हभप पंढरीनाथ नाना तावरे (जालना), निष्काम कर्मयोगी हभप बाळकृष्ण महाराज भोंदे(अहमदनगर), हभप नामदेव महाराज शामगावकर ( सातारा ), स्वामी सागरानंद सरस्वती ( नाशिक ) व शांतिब्रम्ह मारुतीबाबा कुर्हेकर (पुणे) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

२०२३ च्या पुरस्काराची घोषणा करताना महंत उद्धव महाराज म्हणाले की, या पुरस्कारासाठी अनेक नावे समितीच्या विचाराधीन होती. यावर्षीसाठी आम्ही पालघर जिल्ह्यातील आलोंडे ता.विक्रमगड येथील हभप श्रावण महाराज कुवरा यांची निवड केली आहे. ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी गावोगाव पायी, सायकल अशा साधनांचा वापर करून वारकरी संप्रदाय आणि संत विचार घराघरात पोहचवण्याचे काम गेली पाच दशके अविश्रांत केले. शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडताना सुसंस्कारित पिढी घडवली.आदिवासींमध्ये भजन, हरिपाठ, कीर्तन यांची आवड निर्माण केली असल्‍याचे ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक यांनी सांगितले.

 

अनेक गावांत हिंदू देवता आणि संतांची मंदिरे उभी करतानाच, अंधश्रद्धा,अशिक्षितपणा,अनावश्यक रूढी – परंपरा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हभप श्रावण महाराज कुवरा यांनी प्रबोधनाचे मोलाचे काम करतानाच, आदिवासींच्या धर्मांतराला कडाडून विरोध करीत धर्मांतर तर रोखलेच पण अनेकांची घरवापसी केली. त्यांच्या विरुद्ध यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले मात्र ते डगमगले नाहीत. त्यांनी हजारोंचे मोर्चे काढून आदिवासी हे हिंदूच आहेत हे ठणकावून सांगितले. जंगल, डोंगर, हिंस्र प्राणी अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य समाज आणि संप्रदायासाठी खर्च केले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवताना गायक,वादक,कीर्तनकार यांची नवी पिढी आदीवासी भागात उभी करून वारकरी संप्रदाय रुजवला आणि वाढवला. त्यांचे संपूर्ण जीवन आदर्श आणि प्रेरणादायी असून त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत असल्‍याचे पुरस्‍कार निवड समितीने सांगितले.

मानपत्र,स्मृती चिन्ह आणि २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असून शुक्रवार दि.१० मार्च रोजी सकाळी ११ वा. संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगण लोणी जि. अहमदनगर येथे भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या समारंभाला राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, प्रबोधनकार ह.भ.प बाबा महाराज खामकर, ह.भ.प भारत महाराज धावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराच्या घोषणे प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के, लोणीच्या सरपंच कल्पनाताई मैड, उपसरपंच गणेश विखे, विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे, उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles