शिक्षक आणि शिक्षणावर सुलतानी संकट…
हीच ती वेळ आहे परिवर्तनाची ; शिक्षण आणि शिक्षक वाचवण्यासाठी सूर्यकांत विश्वासराव यांना विधान परिषदेत पाठवा – राजकुमार कदम.
बीड- 29 जानेवारी
teachers constituency aurangabad शिक्षक आणि शिक्षणावर आज सुलतानी संकट आले आहे, हीच ती वेळ आहे परिवर्तनाची, शिक्षक आणि शिक्षण वाचविण्यासाठी या क्षेत्रातील गंभीर प्रश्न विधिमंडळाच्या वेशीवर टांगण्यासाठी आणि सुलतानी संकट परतवून लावण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघ या मराठवाड्यातील आद्य शैक्षणिक चळवळीचे उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांना प्रथम पसंतीच्या प्रचंड मतांनी विधान परिषदेत पाठवा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा विद्यमान राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन अतिशय नकारात्मक आहे. देश उभारणीत महत्व पुर्ण असलेल्या या क्षेत्राकडे अनुत्पादक क्षेत्र म्हणून ते बघतात. विद्यार्थी संख्येचे कारण सांगून शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. एकीकडे स्वतः ला अतिशय आकर्षक पेंन्शन योजना घेतली असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना जुनी पेंन्शन द्यायला तयार नाहीत तर दुसरीकडे हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेली वीस बावीस वर्षां पासून विनावेतन काम करीत आहे.
एकविसाव्या शतकातील ही वेठबिगारीच आहे. महाविद्यालयात हजारो उच्च विद्याविभूषित तरूण वीस बावीस वर्षां पासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. शाळा महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद आहे. शिकवायला शिक्षक नाहीत आणि साफसफाईसाठी सेवक नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही सर्व शिक्षक आणि शिक्षण विरोधी धोरणे विधिमंडळात रोखण्यासाठीची ही आमदारकी आहे.
मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने चळवळीच्या आणि शिक्षक आमदारकीच्या जोरावर जे कमावले ते पक्षीय शिक्षक आमदारांनी गमावले आहे. त्यामुळे या पवित्र क्षेत्रात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षक आणि शिक्षणावर आलेले सुलतानी संकट परतवून लावण्याची हीच वेळ आहे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिक्षक आणि शिक्षण वाचविण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांना प्रथम पसंतीच्या प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केले आहे.