TC of Railways won bronze medal in Paris Olympics भारतीय रेल्वेच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेत तिसरा क्रंमाक पटकावला आणि कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी भारताचे ५० मीटर रायफल ३ पोझिशन मध्ये पहिले ऑलिम्पिक पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजीतील देशाचे तिसरे पदक आहे.
अंतिम फेरीत एकूण ४५१.४ गुण मिळवत स्वप्नीलचा क्रिडा पदकासाठीचा प्रवास चमकदार कामगिरीचा होता. सहाव्या स्थानापासून सुरुवात करून, त्याने क्रमवारीत कांस्यपदक मिळवण्यासाठी अपवादात्मक कौशल्य आणि संयम दाखवला. ५० मीटर रायफल ३ पोझिशन मध्ये गुडघे टेकून, प्रोन आणि स्टँडिंग सीरिजमध्ये प्रत्येकी २० शॉट्स शूट केले.
या यशामुळे भारताच्या पदकतालिकेतच भर पडली असे नव्हे तर भारतीय नेमबाजी खेळातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्वप्नीलची ओळख बनली. त्याचे यश अनेक वर्षांच्या समर्पण आणि प्रशिक्षणानंतर आले आहे, ज्यामुळे तो देशातील महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी एक आदर्श बनला आहे.
स्वप्नील कुसाळे, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून भारतीय रेल्वेमध्ये २०१५ साली मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वाणिज्यिक तिकीट लिपिक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी २०२३ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, २०२२ मध्ये बाकू येथील विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. २०२१ मध्ये नवी दिल्ली तसेच त्यांनी २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.
भारतीय रेल्वेने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांना सरावासाठी कामाच्या व्यापातून मजबूत आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वप्नील कुसाळेच्या या यशाबद्दल भारतीय रेल्वेला खूप अभिमान वाटतो आणि या ऐतिहासिक टप्प्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्यांच्या समर्पण आणि मेहनतीमुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे.