बांधावर खते-बियाणे वाहनाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

- Advertisement -
- Advertisement -

बांधावर खते-बियाणे वाहनाला पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

बीड दि. 12,प्रतिनिधी

बांधावर खते-बियाणे वाहनाला हिरवा झेंडा

  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बांधावर खते-बी बियाणे मिळणार असून आत्मा कार्यालय, कृषी विभाग बीड यांनी सुरू केलेल्या बांधावर खते व बियाणे पुरवठा या मोहिमेच्या वाहनाला पालकमंत्री धनंजय मुंडे, कृषी संचालक श्री. जाधव, जिल्हाधिकारी श्री रवींद्र जगताप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यापूर्वी हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बांधावर खते-बियाणे मिळणार आहेत.
खरीप हंगाम 2021 साठी बीड जिल्ह्यात 1600 कोटी पीक कर्जवाटपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन कर्ज मागणारे शेतकरी यांना 100% कर्ज मिळायला हवे, त्यानुसार आवश्यकता भासल्यास लक्ष्य ठरवलेली रक्कम वाढविण्यात यावी. लॉकडाऊनमुळे कर्ज प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव यांच्या मार्फत कर्जाचे अर्ज देणे व अर्ज व आवश्यक कागदपत्रे संकलन करणे अशी गावस्तरावरून प्रक्रिया राबवावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या बैठकीस आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका (व्हीसी द्वारे) आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, विभागीय कृषी संचालक एल.डी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा उपनिबंधक श्री. फडणीस, यांसह कृषी, महसूल, बँका, महावितरण, महाबीज, भारतीय पीक विमा कंपनी या सर्वांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सन 2019-20 मधील तूर, कापूस, भुईमूग, तीळ व तसेच 13 महसुली मंडळातील सोयाबीन पीक विम्याच्या वाटपावरून ना. मुंडे यांनी भारतीय पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले; पीकविमा मंजुर करून 60 दिवसांच्या आत वितरित झाला आहे का याबाबत मंडळनिहाय माहिती दोन दिवसांच्या आत सादर करावी, जर 60 दिवसांच्या आत वितरण झाले नसेल तर मंजूर रकमेवर नियमाप्रमाणे व्याज शेतकऱ्यांना द्यावे असे निर्देश यावेळी ना. मुंडे यांनी दिले आहेत.

कर्मचाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात यावेत किंवा त्याबरोबरीने विमा कंपनीने आपला एक प्रतिनिधी द्यावा, याबाबत मा. कृषी मंत्री यांच्याकडेही बैठक घेऊन निर्णय झालेला आहे, याचेही अनुपालन व्हावे, असेही यावेळी ना. मुंडे म्हणाले. आ. प्रकाशदादा सोळंके यांनी मागील बैठकीत सुचवल्याप्रमाणे सीताफळ या पिकास देखील फळपीक विमा अंतर्गत अधिसूचित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना या वर्षीपासून सीताफळाचा पीकविमा भरता येणार आहे.

मार्च 2021 अखेर जिल्ह्यात 13600 वीज पंपांची वीज जोडणी प्रलंबित आहे, यापैकी जवळपास 4500 जोडणीचा खर्च ऊर्जा विभागाकडून प्राप्त होणे बाकी आहे, यासाठी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल. महावितरणने सब डिव्हिजन निहाय वीज जोडणी साठी कृती कार्यक्रम तयार करावा व प्रलंबित असलेले नवीन कनेक्शन पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावेत अशा सूचना धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी नवीन सबस्टेशन मंजुरी व जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढविणे यासाठी मा. ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.

आणखी वाचा:मराठा आरक्षण,माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले बियाणे, शिल्लक असलेले खते या सर्वांचा धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. यावर्षी कुठेही बियाणे किंवा खतांची टंचाई भासणार नाही याचे सूक्ष्म नियोजन करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचित केले आहे. जुनी शिल्लक खते ही जुन्या भावानेच विक्री व्हावीत तसेच लॉकडाऊनच्या काळात साठेबाजी किंवा चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी भरारी पथके नेमावित असे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कर्जमाफीच्या पोटी शासनाकडून बँकांना मिळालेली रक्कम पुन्हा नव्याने कर्जवाटप करण्यासाठी वापरणेबाबत राज्य शासनाने धोरण निश्चित केलेले आहे. परंतु मागील वर्षी खरीप व रब्बी अशा दोन्हीही हंगामात काही बँकांनी अनियमितता केली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनियमितता व राजकारण केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. बँकेवर नवीन नेमलेल्या प्रशासक मंडळाने याबाबतची सखोल चौकशी करून या अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करावी, तसेच तो अहवाल सादर करावा असे निर्देश या बैठकीत धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles