बीड
Planning a fund outlay of about Rs.545 Crore 49 Lakhs for all-round development of Beed District बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांवरच आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचे सुयोग्य नियोजन केले जाईल असा विश्वास आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यामध्ये सन 2023 24 या आर्थिक वर्षात खर्च करण्यात आलेल्या निधीच्या अहवालास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने सुयोग्य नियोजन करून मागील वर्षीचा शंभर टक्के निधी पास प्रणालीवर खर्च केला त्यामुळे पालकमंत्री मुंडे साहेब सर्वच लोकप्रतिनिधी यांनी नियोजन विभागाचे व प्रशासनाचे अभिनंदन व कौतुक केले.
दरम्यान 2024 – 25 साठी सुमारे 545 कोटी 49 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून, यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 414 कोटी, अनुसूचित जाती योजना साठी 129 कोटी, तर ओटीएसपी योजना साठी दोन कोटी 49 लाख रुपये इतका निधी आरक्षित करण्यात आलेला आहे.
आज संपन्न झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचे संपूर्ण नियोजन करण्याचे अधिकार सर्वानुमते पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले यासंबंधीच्या ठराव आमदार प्रकाश दादा सोळंके व आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी मांडला व त्याला अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी अनुमोदन दिले.
या बैठकीस खा. रजनीताई पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. सुरेश आण्णा धस, आ. बाळासाहेब काका आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा त्याचबरोबर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, परविक्षाधिन जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.
दरम्यान बैठकीच्या शेवटाकडे वळत असताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शासन प्रशासना सर्वच लोकप्रतिनिधींचे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या वातावरणाच्या संदर्भात लक्ष वेधले. निवडणूक संपली मात्र तरीही विविध पक्षाचे कार्यकर्ते किंवा अन्य काही समाजकंटक हे विशेष करून सोशल मीडिया वरून एखाद्या जाती धर्म किंवा राजकीय नेत्यांच्या संदर्भात द्वेष, अफवा व विष पेरणाऱ्या पोस्ट व्हायरल करत असून त्यामुळे जातीय सलोखा बिघडवण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी याबाबत जनजागृती करण्याचे तसेच शांततेचे आवाहन करण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही जाती धर्मातील किंवा कोणत्याही पक्षाचे अनुयायी असलेले अगदी कोवळ्या वयातील तरुण या विखारी प्रचाराला बळी पडत असून त्यांच्यावर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांचे भवितव्य सुद्धा अंधारात येत आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आणि राजकारण व समाजकारणाच्या पलीकडे जाऊन जिल्ह्यामध्ये शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी अशा पोस्ट जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या विरोधात सक्तीने कडक कारवाया केल्या जाव्यात, अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व सायबर विभागाला केल्या आहेत.