कांद्याचे दर पडल्याने उत्पादन खर्चही वसूल होईना; दरवाढीची आशा
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक
आष्टी : प्रतिनिधी
onion price lowered काढणीच्या वेळी पडलेल्या कांदा दरामुळे उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास महिनाभरापासून चांगलीच परवड होते आहे. गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्रवाढ दिसत असली तरी प्रतिकूल परिस्थितीने उत्पादन जास्त होण्याच्या आशेवरही नांगर फिरविला गेल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कायम दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या आष्टी तालुक्यात गत दोन तीन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदी होता.यावर्षी काहीतरी पदरात पडेल या आशेने शेतकरी कांदा पिकाकडे वळला .गेल्या महिन्यात कांद्याला १५ ते १८ रुपये किलोचा भाव मिळत होता मात्र आता कांद्याच्या दरास उतरती कळा लागली असून कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच ते दहा रुपयांचा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गानी तीव्र संताप व्यक्त केला आहे
गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमध्ये आवक वाढताच भाव गडगडले आहेत.कांदा हे खर्चिक पीक आहे तरीही शेतकरी वर्गानी मोठ्या उत्साहात खर्च करीत कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली.
सरकारने इतर पिकाप्रमाणे कांदा पिकास किमान भाव देऊन दिड हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा.निर्यात शुल्काच्या रकमेतून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी तरतूद करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.