सावरगाव (मायंबा) येथे मंगळवारी मच्छिंद्रनाथांचा समाधीस्नान सोहळा
वर्षातून एकदाच समाधीला हात लावून घेता येते दर्शन
आष्टी,
तालुक्यातील गर्भगिरीच्या पर्वतरांगेतील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव (मायंबा) येथे नवनाथांपैकी एक असलेले machhindranath यांची संजीवनी समाधी असुन गुढी पाडव्याच्या फाल्गुनी अमावस्याच्या रात्री म्हणजेच दि.२१ मंगळवारी रोजी दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे.
वर्षभरातून फक्त एकदाच फाल्गुनी अमावस्येला मच्छिंद्रनाथ समाधी वर भाविकांना सुगंधी चंदनलेप, चंदन उटी लेप लावण्याचा कार्यक्रम असतो. भारताच्या कानकोपऱ्यातुन आलेले लाखो नाथभक्त अंघोळ करत दर्शन घेतात. यावेळी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने भाविकांचे सुलभ दर्शनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नवनाथांपैकी आद्यनाथ समजल्या जाणाऱ्या चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच श्री क्षेत्र सावरगाव (मायंबा मच्छिंद्रनाथ) येथे आहे. गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला मोठा अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी येथे संजीवन समाधी घेतलेली असून वर्षातून फक्त एकच दिवस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य अमावास्येला रात्री या समाधीवरील भरजरी भगवे वस्त्र बाजूला काढून समाधीला मंगलस्नान घालून महापूजा केली जाते.
यंदा सोमवारी (दि.२१) सूर्यास्त ते गुढीपाडव्याच्या सूर्योदयापर्यंत मंगळवारी (दि.२२ ) हा सोहळा चालणार आहे. यानिमित्त देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. सोमवारी सूर्यास्तानंतर भाविकांनी पैठण येथून आणलेल्या गंगाजलाने machhindranath temple समाधीस जलाभिषेक घालण्यात येईल.
प्रत्येक भाविकाला समाधीस्नान घालण्याची संधी मिळते. कावडी स्नानानंतर विविध प्रकारच्या दुर्मिळ सुगंधी द्रव्यांनी समाधीवर उटीलेपण केले जाते. हा सोहळा मशालीच्या उजेडात चालतो. तसेच समाधीला स्पर्श करण्यासाठी भाविकांना स्नान करून ओल्या वस्त्रानिशी येणे बंधनकारक असते. या सोहळ्यासाठी महिलांना परवानगी नसून पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही कटाक्षाने पाळली जाते.
महास्नान व महापूजा सुरू असताना रात्रभर मच्छिंद्रनाथ मंदिर देवस्थान परिसर नगारे, डफ व शंखध्वनीच्या निनादाने दुमदुमून जातो. भाविक “सदगुरू महाराज की जय’चा जयघोष करतात. पहाटे महाआरती होऊन सूर्योदयापूर्वी समाधीवर पुन्हा नवे भरजरी भगवे वस्त्र टाकून समाधी झाकली जाते.
गुढीपाडव्याला दिवसभर दर्शनासाठी गर्दी करतात. वर्षातून एकदाच होणार्या या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त व सावरगाव येथील ग्रामस्थांनी केले आहे.