‘सिनेमा डॉट कॉम’ पुस्तकाचे प्रकाशन

- Advertisement -
- Advertisement -

सिनेमा आपल्याला जगणं शिकवतो…

लेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘सिनेमा डॉट कॉम’ पुस्तकाचे प्रकाशन..

सिनेमा आणि आपले एक नाते आहे.सिनेमातूनच आपल्या चांगल्या- वाईट गोष्टी बघायला मिळतात.परंतु त्यातून चांगल्या गोष्टी घेतल्या तरच आपले जीवन सार्थकी लागेल.सिनेमा आपल्याला जगणं शिकवतो.तसेच निसर्गाची किमया आहे,म्हणूनच आपली मानव जातीची एक ओळख आहे.त्यामुळे निसर्गाचा प्रलय थांबण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे.प्रत्येकाने झाड लावून त्याचे पालकप्रमाणे संगोपन करायला हवे तरच पुढील काळात झाडे आपल्याला तारू शकतील, असे प्रतिपादन निसर्गमित्र संदीप राठोड यांनी केले.

वांबोरी साहित्य मित्र मंडळ आयोजित लेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी वांबोरी ग्रामपंचायत मंगल कार्यालयात राठोड बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राठोड यांच्यासोबत माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे,माजी जि. प.अध्यक्ष बाबासाहेब भिटे,माजी सरपंच नितीन बाफना,सरपंच किरण ससाणे,लेखक आशिष निनगुरकर,अचला झंवर व अशोक व्यवहारे उपस्थित होते.

२७ हजार झाडांचे पालक व निसर्गमित्र राठोड पुढे म्हणाले, काळाची गरज ओळखून आपण वृक्षतोड थांबवायला हवी.आज जेव्हा एखादे झाड कापले जाते,तेव्हा सगळ्यात जास्त वेदना मला होतात.त्यामुळे आपला जन्म सार्थकी लागण्यासाठी एखादेतरी झाड लावा व ते जगवा,हाच भविष्यात येणाऱ्या आपल्या पिढ्यांसाठी ही फार मोठी भेट असेल.

यावेळी आमदार तनपुरे म्हणाले,सिनेमाची आवड प्रत्येकाला असतेच.पण लोकांमध्ये जाऊन मला त्यांचे सुख-दुःख वाटून घ्यायला जास्त आवडतात.सध्या शासनाकडे पैसे नसतांना लाडका भाऊ व लाडकी बहीण या योजना केवळ दिखाव्यापुरत्या व लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. त्यापेक्षा झाडे लावण्यासाठी ‘वृक्षमित्र’ योजना सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

येथील युवालेखक व सध्या मुंबईत कला व साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांच्या तेजश्री प्रकाशन निर्मित ‘सिनेमा डॉट कॉम’ या सिनेमाविषयक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.या पुस्तकावर प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी उत्तम अभिप्राय दिला असून ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजलंबकर यांची प्रस्तावना आहे.

या पुस्तकात मराठी,हिंदी,इंग्रजी व इतर भाषेतील साठ चित्रपटांचा बारकाईने अभ्यासपूर्ण दस्तावेज मांडला असून सिनेरसिक व वाचकांसाठी हे पुस्तक एक आगळीवेगळी पर्वणी असल्याचे लेखक आशिष निनगुरकर यांनी सांगितले.सूत्रसंचालन आदिनाथ मोरे तर आभार नासिर कोतवाल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आप्पासाहेब पागिरे,गणेश जगताप,स्वरूप कासार,आदिनाथ मोरे,नासिर कोतवाल,रोहिदास ससाणे,अमोल ससाणे,संतोष महापुडे व शमवेल मकासरे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles